सोलापूर : खासगी बसमुळे बसतोय भुर्दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : खासगी बसमुळे बसतोय भुर्दंड

सोलापूर : खासगी बसमुळे बसतोय भुर्दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहनचालकांनी प्रवाशांच्या खिशातून चांगलीच भाडेआकारणी सुरू केली आहे. यामुळे पुणे, उस्मानाबाद, मुंबई, पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परिवहन विभाग, स्थानिक पोलिस प्रशासनाच्या वरदहस्तामुळे ही लुटमार सुरू असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

मागील दहा दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे ग्रामीण आणि लांब पल्ल्याची एसटी सेवा संपूर्णत: बंद आहेत. याचाच फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. विद्यार्थी, सरकारी आणि खासगी नोकरदार, व्यापारी, शेतकरी यांनादेखील या संपाचा मोठा फटका बसला आहे. संप मिटण्याची चिन्हे अद्याप दिसत नसली तरी या संपाचा फायदा मात्र खासगी प्रवासी वाहनचालकांनी चांगलाच घेतला आहे. प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा उठवत प्रवासी वाहनांनी प्रचंड भाडेवाढ केली आहे. यामध्ये खासगी वाहने, बस आणि सहा आसनी रिक्षाचालकांचादेखील समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोलापूर बसस्थानक आणि अन्य एसटी डेपोमध्ये प्रवाशांची सोय व्हावी यासाठी खासगी वाहनांची सोय करण्यात आली आहे. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भाडेदेखील आकारले जात आहे. अशा अडचणींचा सामना करतच प्रवाशांना आपल्या निश्‍चितस्थळी पोहोचावे लागत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येताना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनांतून प्रवास करणे त्यांना परवडेनासे झाले आहे. एसटी तिकिटांच्या तीनपट भाडे खासगी वाहनचालक प्रवाशांकडून वसूल करीत आहेत. शहरात विशेषतः पुणे, मुंबई, तुळजापूर, उस्मानाबाद, पंढरपूर आदी ठिकाणी जायचे असेल तर जादा तिकीट देऊनही बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी

दरवाढीमुळे मुंबई- पुणे प्रवास करणारे प्रवासी चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. सद्यःस्थितीत खासगी प्रवासी बस चालकांकडून सोलापूर ते पुणे प्रवासासाठी ७०० रुपये प्रतिव्यक्‍ती भाडे आकारले जात आहे. प्रवासी ज्या खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करतात त्या वाहनचालकांकडून मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात आहे.

दर कमी करणे अपेक्षित

कोरोना काळात मर्यादित प्रवासी वाहतूक बंधन घातल्याने मिनीडोअर चालकांनी प्रवासी भाडे वाढविले आहे. मात्र कोरोना काळात निर्बंध शिथिल केल्यानंतरदेखील हे प्रवासी भडे कायम ठेवण्यात आले आहे. निर्बंधांमध्ये प्रवासी वाहतुकीवर चार प्रवाशांना वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र आता पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक केली जात असल्याने दर कमी करणे अपेक्षित होते. त्यातच आता एसटीचा संप असल्याने पुन्हा भाडेवाढ करण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले.

loading image
go to top