
सोलापूर कोरोनामुक्त! ३० दिवसांत एकही रुग्ण नाही
सोलापूर : कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये आतापर्यंत शहरातील ३३ हजार ६६६ जण कोरोना बाधित आढळले. तर दुसरीकडे ग्रामीणमधील एक लाख ८६ हजार ६४ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. बार्शी, पंढरपूर व मंगळवेढ्यात प्रत्येकी एक रुग्ण असून उर्वरित संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सोलापूर शहरात ७ एप्रिलपासून एकही रुग्ण आढळला नसून शहर पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाने हा:हाकार माजविला होता. रुग्णाच्या जवळ गेलेल्यांनाही कोरोनाची बाधा होते. जीवघेण्या कोरोनाला घाबरून अनेकजण घरातून बाहेर निघत नव्हते. तरीही, दररोज शहर-ग्रामीणमध्ये कोरोनाचे तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. मृत्यूचे तांडव माजले होते. रुग्णवाढ व मृत्यूदरात राज्याच्याच नव्हे तर देशाच्या टॉपटेन जिल्ह्यांच्या यादीमध्ये सोलापूरचा समावेश होता. पण, प्रतिबंधित लसीमुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली आणि कोरोना परतीच्या वाटेवर निघाला. आता १२ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील बहुतेक व्यक्तींनी प्रतिबंधित लस घेतली असून आता बुस्टर डोस घेतला जात आहे. जिल्ह्यातील दोन लाख १९ हजार ७३० रुग्णांपैकी दोन लाख १४ हजार ४९६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या ग्रामीणमधील तीन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आता शहरातील २६ प्रभाग कोरोनामुक्त झाले असून ग्रामीणमधील बहुतेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तरीही, प्रशासनाकडून नागरिकांना मास्क वापरण्याचे आणि प्रतिबंधित लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोनाची जिल्ह्याची सद्यस्थिती
एकूण बाधित व्यक्ती
२,१९,७३०
कोरोनामुक्त रुग्ण
२,१४,४९६
कोरोनाचे बळी
५,२३१
सक्रिय रुग्ण
३
महिन्यात एकही मृत्यू नाही
मार्च २०२० पासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर एप्रिल २०२० मध्ये सोलापूर जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णवाढ व मृत्यूदर वाढतच गेला. पण, कोरोनाची स्थिती आता बदलत असून मागील एक महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या खूपच कमी झाली. तर दिलासादायक बाब म्हणजे एक महिन्यात शहर-ग्रामीणमध्ये कोरोना झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.