
सोलापूर: केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत महापालिकेने अशोक लिलँड कंपनीशी करार करून २०१४ मध्ये ३८ कोटींच्या बस खरेदी केल्या. सुरवातीला १७ कोटी भरले होते. खरेदी केलेल्या बसचे चेसी क्रॅक निघाल्याने उर्वरित २१ कोटी भरले नाहीत. प्रकरण लवाद आणि नंतर जिल्हा न्यायालयातही गाजले. दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या विरोधातच निकाल लागला. आता महापालिकेला २१ कोटींचे व्याजासह ४२ कोटी भरावे लागणार आहेत. याशिवाय या बस रस्त्यावर धावल्याच नसल्याने महिन्याला ३० लाख प्रमाणे दहा वर्षांचे ३६ कोटींचे उत्पन्नही बुडाले. तीन ते चार वेळा या बसची तांत्रिक तपासणी झाली. त्यालाही एक कोटी दहा लाख खर्च झाला. करारातील त्रूटींमुळे झालेले एकंदरीत हे नुकसान १०० कोटींच्या घरात आहे.