Solapur Corporation : महापालिका परिवहनने गमावली कमाईची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Corporation : महापालिका परिवहनने गमावली कमाईची संधी

Solapur Corporation : महापालिका परिवहनने गमावली कमाईची संधी

सोलापूर : महापालिकेचा परिवहन उपक्रम अडचणीत आलेला असतानाही त्याला अडचणीतून बाहेर काढण्याचा ठोस प्रयत्न होताना दिसत नाही. शहरात १५ हजार ७५१ रिक्षा असून त्यांनी तिकीट दर वाढविले, परंतु, शहरातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या परिवहन उपक्रमाचे तिकीट दर चार वर्षांपासून तेवढेच आहेत. महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडील फक्त २८ बसगाड्याच सध्या मार्गावर धावत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात सर्वाधिक प्रवासी असलेल्या मार्गांवर बस सोडून उत्पन्न कमावण्याची संधी महापालिका परिवहनने गमावली आहे.

हेही वाचा: 'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

शहरात दुचाकी, चारचाकीसह रिक्षांची संख्या प्रचंड वाढली असून रस्तेदेखील अरुंद पडू लागल्याची स्थिती आहे. तरीही, रस्त्यावरुन खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावरील परिवहन उपक्रमाला उभारी देऊन प्रवाशांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. महापालिकेच्या परिवहनकडे सध्या ५० चालक आणि ५० वाहक असून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पर्यायी मार्ग निवडला आहे. कर्मचारी व बस कमी असल्याने शहराबरोबरच चपळगाव, बीबी दारफळ, मार्डी, मंद्रूप या ठिकाणी ग्रामीण भागात बस जात आहेत. आता शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर प्रवाशी वाढतील, असा विश्‍वास परिवहन अधिकाऱ्यांना वाटू लागला आहे. मात्र, बसगाड्याच नाहीत, अशी स्थिती आहे.

हेही वाचा: ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

दोनदा प्रस्ताव, तरीही तिकीट दरवाढीचा निर्णय नाही

डिझेलचे दर ६० रुपयांपर्यंत असताना महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बस गाड्यांचे तिकीट दर प्रति सहा किलोमीटरसाठी पाच रुपये होते. आता डिझेलचा दर शंभर रुपयांवर गेलेला असतानाही तिकीट दर तेवढाच आहे. महापालिकेचा परिवहन उपक्रम अडचणीत येण्यासाठी ते प्रमुख कारण आहे. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करतानाही परिवहनच्या बसगाड्यांच्या प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी व आरटीओ कार्यालयाकडे १५ टक्‍के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र, मागील सहा महिन्यांत दोनदा पत्रव्यवहार करुनही त्यावर अजूनपर्यंत निर्णय घ्यायला अधिकाऱ्यांना वेळ मिळालेला नाही, हे विशेष.

टोल अन्‌ अंतराचा उत्पन्नाला अडथळा

‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर महापालिकेचा परिवहन उपक्रम सुरु आहे. शाळकरी मुलांसह दिव्यांगांना तिकीट दरात सवलत दिली जाते. महापालिकेतील बसगाड्या २० किलोमीटरपर्यंतच धावू शकतात. काही गाड्यांचे अंतर ४० किलोमीटरपर्यंत करण्यात आले होते. मात्र, मोठ्या बसगाड्या खरेदी केल्यांनतर त्या शहरातील अरुंद रस्त्यावरच धावल्या आणि सध्या त्या गाड्या चेसी क्रॅकमुळे स्क्रॅपमध्ये पडून आहेत. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी असलेल्या बसगाड्यांना टोल माफी असावी, इंधनावरील टॅक्‍स माफ व्हावा, जेणेकरून हे उपक्रम चांगले सुरु राहतील, अशी अपेक्षा वाहतूक व्यवस्थापक इरण्णा वण्यालोल्लू यांनी व्यक्‍त केली.

महापालिका परिवहनची सद्यस्थिती...

मार्गावर बसगाड्या : २९

दररोजचे सरासरी उत्पन्न : ९०,०००

चालक-वाहक : १००

तिकीट दर (प्रतिसहा कि.मी.) : ५ रुपये

loading image
go to top