esakal | Solapur: बरडे-देशमुख यांचा कलगीतुरा नाही जनमतात, फक्त सोशल मीडियात
sakal

बोलून बातमी शोधा

बरडे-देशमुख

बरडे-देशमुख यांचा कलगीतुरा नाही जनमतात, फक्त सोशल मीडियात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाजप-शिवसेना एकेकाळचे जुने मित्र, एकाच ताटात २५ वर्षे जेवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच औरंगाबाद येथे भाजपला भावी सहकारी म्हणून पुकारले. मात्र, सोलापुरात जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मात्र, हा कलगीतुरा सोशल मीडियात होता. बरडेंची दमबाजी ही फक्त फोनबाजी होती अन्‌ देशमुखांचे कार्यकर्ते बैठकीला आले होते.

ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एक महिन्यापूर्वी व्हीजेएनटी व ओबीसी समाजाचा भव्य दिव्य मेळावा जुळे सोलापूर येथे झाला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून व आजपासच्या पसिरारातून मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव या मेळाव्याला आले होते. या मेळाव्याचे नेतृत्व मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केले होते. या संबध कार्यक्रमावर काँग्रेसची छाप होती. बहुजनासह अठरापगड जाती जमाती एकत्रित होण्याकरीता काँग्रेस हे उत्कृष्ठ व्यासपीठ आहे. याच धर्तीवर ओबीसी समाजाला आकर्षित करण्याचा एक प्रयत्न भाजपनेही केला. ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. अर्थात पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला.

हेही वाचा: मुंबईत आणखी एक संशयित दहशतवाद्याला अटक; महाराष्ट्र ATSची कारवाई

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. त्याप्रमाणे तो भाजपला आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनाही आहे. पुतळा जाळण्याचा प्रयत्न हा प्रत्येक आंदोलनाचा भाग झालेला आहे. वेगवेगळ्या आरक्षणाच्या लढ्यात आसूड आंदोलनापासून तिरडी यात्रा निघाल्या आहेत. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांचे पुतळे जाळून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रघात आहे. यात ‘दमबाजी’ करण्याइतके गैर काहीच नव्हते. पुतळा जाळून (खरे म्हणजे तो जाळलाच नाही पोलिसांनी ताब्यात घेतला) काही तास होताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी श्रीकांत देशमुख यांना दुरध्वनीवरून ‘दमबाजी’ केली. या दमबाजीची ऑडिओ क्‍लिप समाज माध्यमावर व्हायरल होताच दोन्हीकडून उत्तरे-प्रतिउत्तरे झाली.

हेही वाचा: टेंभुर्णी : ‘विठ्ठलराव शिंदे’ने दिली १०० टक्के एफआरपी

वादावर पडदा पडला असे वाटताच सोमवारी भाजपच्या मंडलनिहाय बैठकाच्या निमित्ताने सोलापूर येथे जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना घेऊन श्रीकांत देशमुख यांनी शक्तीप्रदर्शनाची संधी सोडली नाही. जणू ‘असेल औकात तर या चौकात’ या आविर्भावाने ते पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख पुरषोत्तम बरडे यांच्या मरीआई चौक ओलांडू देणार नाही, या दमबाजीला श्रीकांत देशमुख यांनी ‘मरीआई चौकच नव्हे तर तुम्ही रहता त्या संभाजी चौकात आलो आहे, अडवून दाखवा’ असे म्हणत प्रतिउत्तर दिले. यात खरी गंमत अशी की, श्रीकांत देशमुख यांना अखेरपर्यंत पत्रकारांनी खोदून खोदून विचारूनही आव्हान कोणाला आहे, त्यांचे नाव काही त्यांनी घेतले नाही.

पुरुषोत्तम बरडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द काढले म्हणून राणे यांची छायाचित्रे प्रत्येक मुताऱ्यांवर लावली होती. श्रीकांत देशमुख यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे हक्क मागितले होते. दोघांच्याही समाज माध्यमातील खडाजंगीने आणि त्यांचीतील या कलगीतुऱ्यांने नेटकऱ्यांची करमणूक मात्र नक्की झाली.

- अरविंद मोटे

loading image
go to top