Solapur: जिल्ह्यात 16 नोव्हेंबरपासून बालसंजीवनी अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur ZP

सोलापूर : जिल्ह्यात 16 नोव्हेंबरपासून बालसंजीवनी अभियान

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर(जि. सोलापूर) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित जिल्हा परिषदेच्यावतीने सोलापूर जिल्ह्यात अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी हे अभियान मंगळवारपासून (ता.16) राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे आयोजन करत असताना स्वातंत्र्यलढ्याची भावना,त्यामधील त्याग,देशाच्या उभारणीतील अनेकांचे योगदान हे नागरिकांसह विद्यार्थी व तरुणांना अनुभवता यावे,या उद्देशाने सद्यस्थितीत देशात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच यानिमित्ताने महात्मा गांधींची 'खेड्याकडे चला'ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा: ‘हर घर दस्तक’ लसीकरणास सहकार्य करा : पालकमंत्री पाटील

सोलापूर जिल्ह्यात एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत 4 हजार 214 अंगणवाडी कार्यरत आहेत.सद्यस्थितीत ग्रामीण क्षेत्रातील बालमृत्यूचे वाढते प्रमाण पाहता बालमृत्यूला आळा घालणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण राज्याच्या बालमृत्यूच्या प्रमाणाच्या तुलनेत कमी आहे.तथापि हे प्रमाण अजून कमी करून देशाची भावी पिढी जतन करण्यासाठी बालमृत्यूंच्या कारणांचा शोध घेऊन वारंवार जास्त असणाऱ्या कारणांचा नायनाट करण्याकरिता हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

या अभियानाची सुरुवात 16 नोव्हेंबर रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकाच वेळी होणार आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी,बालमृत्यूबाबत कामकाज करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे.16 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत गर्भवती, स्तनदा माता यांना आहार व आरोग्यविषयक समुपदेशन,सॅम व मॅम बालके व दुर्धर बालके स्क्रिनिंग,गृहाभेटीद्वारे बालमृत्यूची कारणमीमांसा,संदर्भ सेवा आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामपंचायती व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सत्कार 26 जानेवारी 2022 रोजीच्या ग्रामसभेत करून संबंधित अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,आरोग्यसेविका व वैद्यकीय अधिकारी यांना त्यावेळी सन्मानित केले जाणार आहे.

हेही वाचा: उमरगा शहरात पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या

बालसंजीवनी अभियानाची बालदिनापासून सुरुवात करायची होती.मात्र,रविवारी सुट्टी व 15 नोव्हेंबरच्या कार्तिकी एकादशीमुळे 16 नोव्हेंबर रोजी अभियानास प्रारंभ होत आहे.त्यानंतर जिल्हाभर प्रभावीपणे हे अभियान राबविले जाणार आहे.

-दिलीप स्वामी,मुख्य कार्यकारी अधिकारी

या उपक्रमात हे होणार-

० अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वयोगटातील सर्व बालकांची 100 टक्के तपासणी

० बालमृत्यूंच्या कारणांसहित यादी

० विशेष तपासणी कॅम्पचे आयोजन करून दुर्धर बालकांना आवश्यकतेनुसार पुढील उपचार

० गरोदर महिलेच्या प्रतितिमाही वजनात होणारी वाढ,एचबी व थायरॉईड तपासणी

loading image
go to top