esakal | 80 वर्षांच्या आजोबाला नातवानेच घातला साडेतेरा लाखांचा गंडा!
sakal

बोलून बातमी शोधा

80 वर्षांच्या आजोबाला नातवानेच घातला साडेतेरा लाखांचा गंडा!

स्वतःच्या नातवानेच वयोवृद्ध आजोबाची दिशाभूल करून 13 लाख 50 हजार रुपये हातोहात घेऊन पोबारा केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे.

80 वर्षांच्या आजोबाला नातवानेच घातला साडेतेरा लाखांचा गंडा!

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : स्वतःच्या नातवानेच वयोवृद्ध आजोबाची दिशाभूल करून 13 लाख 50 हजार रुपये हातोहात घेऊन पोबारा (Fraud) केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर हतबल झालेले आजोबा नामदेव विठू केसकर (रा. केसकरवाडी, ता. पंढरपूर) यांनी नातू दीपक लक्ष्मण केसकर याच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात लेखी तक्रार (Crime) दाखल केली आहे.

हेही वाचा: सोलापुरी चादरीच्या फॅशनेबल शर्टात झळकला अमेरिकन पॉपस्टार निक जोनास!

याबाबतची माहिती अशी की, नामदेव विठू केसकर यांनी स्वतःच्या नावे असलेली चार एकर 20 गुंठे जमीन विकली होती. जमीन विक्रीतून त्यांना 45 लाख रुपये आले होते. खासगी लोकांचे कर्ज फेडून त्यांच्याकडे 22 लाख रुपये शिल्लक होते. त्यापैकी त्यांनी भाळवणी येथील युनियन बॅंकेत 15 लाख 50 हजार रुपये ठेवले होते. जानेवारी 2020 मध्ये नातू दीपक केसकर याला दोन लाख रुपये दिले होते. दुसरा मुलगा रामचंद्र केसकर हा विभक्त राहात असल्याने नातू दीपक हाच त्यांच्यासोबत बॅंकेत जाऊन पैशाची देवाण- घेवाण करत होता. दीपकने युनियन बॅंकेत व्याज कमी मिळते व मुलगा रामचंद्र हा फसवून तुमच्या नावावरील पैसे काढून घेईल, अशी भीती घातली. त्यानंतर 13 लाख 50 हजार रुपये रक्कम काढून ती महूद येथील मन मंदिरा या बॅंकेत ठेवण्यासाठी नेली. तेथे त्याने बॅंकेच्या कागदपत्रावर आजोबा नामदेव केसकर यांचे अंगठ्याचे ठसे घेऊन पैसे बॅंकेत ठेवल्याचे सांगितले. नातू दीपक हा पुणे येथे राहात असल्याने तो गावी आला की त्याकडे बॅंकेच्या पासबुकची व व्याज काढून आणण्याची मागणी आजोबा नामदेव केसकर यांनी केली असता, तो नंतर आणू, असे कारणे देऊन टाळाटाळ करत होता. पैशाबाबत जास्त आग्रह केल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून दीपक गावाकडे फिरकलाच नाही.

हेही वाचा: चित्रकार मस्केने साकारले पडीक जमिनीवर 15 बाय 30 फुटांचे गणराय !

मागील तीन आठवड्यांपूर्वी घराजवळ फिरत असताना आजोबा नामदेव केसकर पडून जखमी झाले. शस्त्रक्रिया करावी लागणार त्यामुळे दीपकला फोन करून बोलावून घे, असे त्याच्या आईजवळ सांगितले असता, दीपकचा फोन लागत नाही, असे त्याच्या आईने सांगितले. अखेर नामदेव केसकर यांनी मुलीचा मुलगा विठ्ठल मासाळ यास घेऊन महूद येथे बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेले असता, खात्यावर फक्त 200 रुपये असल्याचे आढळून आले. हे पाहून नामदेव केसकर यांना मोठा धक्काच बसला. नातू दीपकने आजोबा नामदेव केसकर यांच्या नावावर पैसे न ठेवता ते पैसे घेऊन त्याने पोबारा केल्याचे लक्षात आल्यानंतर दीपक केसकर याच्या विरोधात आजोबा नामदेव केसकर यांनी फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे.

loading image
go to top