esakal | लोकसंख्या 46 लाख अन्‌ व्हेंटिलेटर 275 ! जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अपुरीच

बोलून बातमी शोधा

आरोग्य यंत्रणा
लोकसंख्या 46 लाख अन्‌ व्हेंटिलेटर 275 ! जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अपुरीच
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यात 13 आमदार, दोन खासदार, 32 हून अधिक साखर कारखाने, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी जवळीकता असलेले अनेक माजी मंत्री... अशी परिस्थिती असतानाही आरोग्य यंत्रणा सुधारलेली नाही. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाखांहून अधिक असतानाही आपल्याकडे केवळ 275 व्हेंटिलेटर असून दोन हजार 161 ऑक्‍सिजन बेड उपलब्ध आहेत. दररोज बेड हाउसफुल्ल होत असून वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकजण जगाचा निरोप घेत आहेत.

महापालिका असो वा जिल्हा परिषदेच्या दरवर्षीच्या बजेटमध्ये केवळ एक ते दीड कोटीचा निधी आरोग्य विभागावर खर्च केला जातो. त्यातही सर्वाधिक निधी हा आरोग्य विभागाच्या इमारती डागडुजी, नव्या इमारतीच्या बांधकामासाठीच वापरला जातो. मात्र, आजवर एकाही पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटले नाही, की त्या ठिकाणी अत्याधुनिक उपचार सामग्री खरेदी करून खासगी रुग्णालयांप्रमाणेच सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाचा जिल्ह्यात प्रवेश होऊन आता एक वर्ष संपले, तरीही आरोग्य विभाग सक्षम झालेला दिसत नाही. कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, हॅंडग्लोव्ह्‌ज, सोडियम हायड्रोक्‍लोराईड, औषधे खरेदीसाठी 27 कोटींहून अधिक निधी खर्च झाला. मात्र, या काळात ना महापालिकेने ना जिल्हा परिषदेने एक व्हेंटिलेटर खरेदी केला.

हेही वाचा: सोलापूर शहरात 2, 8 आणि 9 मे रोजी कडक संचारबंदी

आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावचा विकास होईल, कोणत्याही आजारपणात उपचाराअभावी कोणी मरणार नाही, असा जनतेला विश्‍वास आहे. मात्र, गावगाड्यातील परिस्थिती खूपच वेगळी असल्याची वस्तुस्थिती कोरोनाने उघड केली आहे. शहर- जिल्ह्यातील सहाशे रुग्णालये असून त्यातील 113 रुग्णालयांमध्ये सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तरीही, अनेक रुग्णांना ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेड वेळेत न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे.

हेही वाचा: जिल्ह्यात 1 मेपासून पाच केंद्रांवर 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण ! "अशी' असेल नोंदणीची पद्धत

जिल्ह्यातील वैद्यकीय सद्य:स्थिती...

  • कोरोनावर उपचार करणारी रुग्णालये : 113

  • एकूण बेड : 20,243

  • ऑक्‍सिजन बेड : 2,161

  • व्हेंटिलेटर : 275

दोनशे बेड वाढणार

पंढरपूर तालुक्‍यातील सहा रुग्णालयांनी सुमारे शंभर बेड वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. त्या प्रस्तावांची छाननी सुरू असून त्या ठिकाणी ऑक्‍सिजन बेड असणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. दुसरीकडे, होटगी रोडवरील श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या काडादी मंगल कार्यालयात शंभर बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याची शुक्रवारी पुन्हा महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्‍त पी. शिवशंकर, आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांनी पाहणी केली.