esakal | जिल्ह्यात 1 मेपासून पाच केंद्रांवर 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण ! "अशी' असेल नोंदणीची पद्धत

बोलून बातमी शोधा

Vaccination

जिल्ह्यात 1 मेपासून पाच केंद्रांवर 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण ! "अशी' असेल नोंदणीची पद्धत

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील 18 ते 44 वयोगटातील तीन लाख 66 हजार 401 तर ग्रामीणमधील 13 लाख 13 हजार 401 व्यक्‍तींना 1 मे पासून लस टोचण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पाच केंद्रे सुरू केली जाणार असून त्या ठिकाणी दररोज दोनशे जणांना लस टोचली जाणार आहे.

लसीचा तुटवडा असल्याने सुरवातीला पाच केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सात दिवसांसाठी त्या केंद्रांवर लसीकरण सुरू राहणार आहे. त्यानंतर लस उपपलब्ध झाल्यानंतर केंद्रे वाढविली जाणार आहेत. दरम्यान, त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्यात उद्या (1 मे) साडेसात हजार कोविशिल्ड लस मिळणार आहे. दुसरीकडे 45 वर्षांवरील व्यक्‍तींना लस टोचण्याची मोहीम बंद ठेवली जाणार आहे.

हेही वाचा: शंभर वर्षीय आजोबांची 16 तासांची झुंज अपयशी ! जिल्ह्यात वाढले 2486 रुग्ण; 42 मृत्यू

लस कमी मिळाल्याने शुक्रवारी (ता. 30) शहर- जिल्ह्यातील 54 केंद्रांवर केवळ दुसरा डोस घ्यायला आलेल्याच व्यक्‍तींना लस टोचण्यात आली. शहरातील काही नागरी आरोग्य केंद्रांवर लोकांनी गर्दी केली होती. त्यांना टोकन देऊन परत पाठविण्यात आले. दुपारनंतर ते लसीकरण केंद्रांवर आल्यानंतर लस संपल्याचे त्यांना सांगण्यात आले. घरापासून लसीकरण केंद्रांवर येईपर्यंत त्यांना रिक्षासाठी शंभर ते दीडशे रुपयांचे भाडे द्यावे लागले. तरीही लस मिळालीच नाही. काही ठिकाणी ओळखीच्या व्यक्‍तींना लस टोचण्यात आल्याचेही पहायला मिळाले.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच दोनदा लस घेतल्यानंतर मृत्यू होत नाही आणि संबंधिताला गंभीर आजार होत नाही. लसीचे दोन डोस घेऊनही कोरोना झालेले ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरविना बरे होतात, असे आरोग्य विभागाने निरीक्षण नोंदविले. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी वाढत आहे, परंतु मागणीप्रमाणे लस मिळत नाही.

हेही वाचा: "सैराट'मधील आर्चीचं गाव पुन्हा चर्चेत ! काय केलंय या गावानं?

"या' केंद्रांवर लसीकरण

शहर-जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील 16 लाख 79 हजार 688 व्यक्‍तींना लस टोचली जाणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बार्शी नागरी आरोग्य केंद्र, मोडनिंब व गादेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कुंभारी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर तर शहरातील व्यक्‍तींसाठी रेल्वे हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. त्या ठिकाणी 44 वर्षांवरील कोणालाही लस टोचली जाणार नाही. तर 18 ते 44 वयोगटातील व्यक्‍तींनी त्यांच्या मोबाईलवरून स्वत:हून ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केलेल्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठविला जाणार आहे. ज्या दिवशी आणि ज्या वेळेला त्यांना लसीकरणासाठी बोलावले आहे, त्याच वेळी त्यांना लस टोचली जाणार आहे.