
वाहतूक पोलिसांचे आदेश! दुसऱ्यांदा नियम मोडू नका, नाहीतर वाहन होणार जप्त
सोलापूर : शहरातील वाहनांची संख्या वाढली असून अवजड वाहने रात्रभर शहरातून जात आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून वाहनचालकांचा बेशिस्तपणा पण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. १ ते २२ मे या २२ दिवसांत बेशिस्त वाहनचालकांना ३३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा दंड केला आहे. आता एकाच वाहनचालकाने दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ते वाहन जप्त केले जाणार आहे.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तीन दिवस विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्व पोलिस ठाण्याच्या परिसरात वाहनांची तपासणी केली जात आहे. चार वाहनांची तपासणी केल्यावर त्यात १५ वाहने संशयित आढळली आहेत. त्याचा आरटीओच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. रिक्षा भाडेवाढ आणि त्यात होणारी लूट, या अनुषंगाने पण २०० रिक्षांची तपासणी झाली. अनेकदा परगावाहून आलेल्या प्रवाशांकडून जास्त भाडे घेतले जाते. वाद होतात, पण प्रवासी बाहेरचे असल्याने त्यांना पोलिसात तक्रार देता येत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अचानक रिक्षांची पण तपासणी केली. दुचाकीवरून ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा वाहनांवर विशेष वॉच ठेवला गेला. तशी १५ वाहने वाहतूक पोलिसांनी जप्त केली. पण, एकाच वाहनचालकाने दुसर्यांदा वाहतूक नियम मोडला, तर त्याचे वाहन जप्तही केले. त्यांच्यावर खटला भरून न्यायालयातून ते वाहन सोडावे लागणार आहे. दरम्यान, शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था सुधारावी, सर्वांनी नियम पाळावेत, वाहतूक कोंडी होणार नाही, अपघात कमी होतील, यासाठी हा खटाटोप सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा: सोलापूर: काँग्रेसला गळती अन् नेत्यांचे लक्ष मुंबई-दिल्लीत; राष्ट्रवादीचा डाव?
आता कारवाई सुरूच राहणार
बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. वाहतूक कोंडीलाही तेच जबाबदार असतात. त्यामुळे त्यांनी वाहतूक नियम तंतोतंत पाळावेत, वाहतूक व्यवस्था सुधारावी, या हेतूने त्यांना दंड करण्यात आला. २२ दिवसांत चार हजार ६२१ केसेस करीत साडेतीन लाखांचा दंड रोखीने वसूल केला गेला आहे. तर ३० लाख ४५ हजार ४०० रुपयांचा दंड अनपेड आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी वाहतूक पोलिसांसाठी प्रत्येक चौकात छत्र्या उभारल्या गेल्या आहेत.
हेही वाचा: SP सातपुतेंचे ऑपरेशन परिवर्तन! रोजगार मेळाव्यातून १०० जणांना नोकरी
शहरात हेल्मेट सक्ती आहे की नाही?
कोणत्याही मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करताना प्रत्येक दुचाकीस्वाराकडे हेल्मेट असायला हवे. जेणेकरून त्याचा अपघात झाला तर जीव जाणार नाही, हा त्यामागील हेतू आहे. पण, ग्रामीण भागात किंवा महामार्गावर त्या अनुषंगाने काहीच कारवाई दिसत नाही. दुसरीकडे शहरात हेल्मेट सक्ती आहे की, याबाबतीत पोलिस स्पष्टपणे काहीच सांगत नाहीत. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा बेशिस्तपणा वाढल्याचे चित्र आहे.
Web Title: Traffic Police Orders Do Not Break The Rules A Second Time Otherwise The Vehicle Will Be
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..