
Ukraine Russia War : तिरंग्यापासून स्फूर्ती आम्ही युक्रेनमध्ये सुरक्षित आहोत!
करकंब: 'तिरंग्यापासून स्फूर्ती आम्ही युक्रेनमध्ये सुरक्षित आहोत!' असा संदेश पाठवत युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या तपकिरी शेटफळ (ता.पंढरपूर) विश्वास बोंगे याने सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. त्याच्यासह तालुक्यातील चारही जण सध्या सुखरूप आहेत. त्यातील दोघेजण भारतीय दूतावासाच्या मदतीने बसने प्रवास करत युक्रेनच्या सीमा ओलांडून रोमानिया येथून भारतात येण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या पालकांनी 'सकाळ'ला सांगितले.
रशियाने गुरुवार ( ता.24) रोजी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पंढरपूर तालुक्यातील विश्वास ज्योतिराम बोंगे (तपकिरी शेटफळ), वेदांत बाळासाहेब पाटील (रोपळे), वैष्णवी दिलीप कदम (पंढरपूर) व प्रसाद शिंदे-नाईक (पंढरपूर) हे चार जण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तेथील युद्धजन्य परिस्थितीचा अंदाज आल्याने ह्यांनी भारतात येण्यासाठी विमानाची तिकीटेही काढून ठेवली होती. यांच्यासह भारतातील काही जणांचे तिकीट 24 तारखेचे तर काही जणांचे 27 तारखेचे होते. पण 24 तारखेला पहाटेच हल्ला झाल्यानंतर सर्व युक्रेनमधील सर्व विमानसेवा बंद झाली. आणि त्याच दिवशी भारतीयांना मायदेशात आण्याससाठी गेलेले विमान रिकामेच परत आले. त्यानंतर अद्याप विमानसेवा सुरू न झाल्याने तेथील विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी हर एक प्रारकरची शक्यता तेथील भारतीय दुतावासाकडून तपासली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून युक्रेन मधील ओडिसा शहरातील भारतीय विद्यार्थ्यांना दहा तासाच्या बस प्रवासाने युक्रेनच्या सीमा ओलांडून मोलडोवा येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेथून रोमोनिया येथपर्यंतचा आणखी काही तासांचा बस प्रवास करून तेथून विमानाने भारतात आणले जाणार आहे. यामध्ये पंढरपूर येथील वैष्णवी दिलीप कदम व वेदांत बाळासाहेब पाटील या दोन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
याशिवाय विश्वास ज्योतिराम बोंगे हा डेनिप्रो या शहरात व त्याच नावे असणाऱ्या विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याने भारतात येण्यासाठी 27 फेब्रुवारीचे विमान तिकीट बुक केले होते. पण तीन दिवस आधीच विमानसेवा बंद झाल्याने त्याला भारतात येता आले नाही. पण त्याचे कुटुंबीय, नातलग, मित्र सतत त्याच्या संपर्कात असून युक्रेनमधील युद्धाच्या कसल्याही झळा अद्याप डेनिप्रो शहरापर्यंत आल्या नसल्याचे त्याने सांगितले. तरीही काही आपत्कालीन परिस्थिती उदभवली तर विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंकरची व्यवस्था केली असल्याचे त्याने सांगितले. या परिस्थितीतही आपल्या स्वकीयांना घाबरून न जाता खंबीर राहण्याचे सांगत त्याने एक सुंदर मेसेज पाठविला आहे
विश्वास बोंगे याने युक्रेनमधून आई-वडिलांना पाठविलेला मेसेज
तिरंग्यापासून स्फूर्ती
आम्ही युक्रेनमध्ये सुरक्षित आहोत
काळजी करू नका
लवकरच भारतात येऊ
छोट्या-मोठ्या संकटांना घाबरून न जाता त्याला तोंड देत त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठीचा महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा इतिहास आहे आणि इतिहासातील हे प्रसंग आमच्या मनावर कोरलेले आहेत
गेल्या दोन दिवसात आम्ही कल्पनाही केली नव्हती इतक्या लोकांनी आमची विचारपूस केली आणि अनेक आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे राहिलेआम्हाला आणि आमच्या पालकांना सर्वांनी आधार दिला त्याबद्दल सर्वांचे आभार
डॉ.विश्वास बोंगे - युक्रेन