
विद्यापीठ परीक्षा! वस्तुनिष्ठ प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा वाढीव वेळ नाहीच
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आगामी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला वर्णनात्मक प्रश्नपत्रिका असल्याने प्रत्येक तासाला १५ मिनिटांचा वाढीव वेळ देण्याचे ठरले होते. पण, आता तो वेळ मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका तासात ५० प्रश्नांची अचूक उत्तरे लिहावी लागणार आहेत.
हेही वाचा: बाळासाहेब म्हणाले होते...‘उद्धव अन् आदित्यला सांभाळा’! जिल्हाप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत
विद्यापीठाची सत्र परीक्षा १४ जुलैपासून सुरू होणार आहे. साधारणत: महिनाभर ही परीक्षा चालेल. पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मिळून जवळपास ७० हजार विद्यार्थी परीक्षा देतील. कोरोनामुळे बहुतेक दिवस कॉलेज बंदच राहिले आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. दोन वर्षांच्या कोरोना काळात विद्यापीठाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांवरच ऑनलाइन पार पडल्या. त्या काळात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरवेळी एका तासाला १५ मिनिटांचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय ठरला. त्यानुसार विद्यापीठाने नियोजन केले आणि २० जूनपासून परीक्षा होईल, असे स्पष्ट केले. पण, पुन्हा आषाढी वारीचे कारण देत परीक्षा पुढे ढकलल्या. याच काळात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत मोठा फेरबदल केला. आता विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतील. त्या ५० गुणांचे रूपांतर संबंधित विषयाच्या एकूण गुणात केले जाणार आहे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांची टक्केवारी निश्चितपणे वाढेल, सामान्य विद्यार्थ्यांची पंचाईत होईल, असे बोलले जात आहे. वर्णनात्मक परीक्षेत काही प्रमाणात प्रश्नांचे उत्तर लिहिल्यास कमी गुण मिळतात, पण अनुत्तीर्ण होण्याची खूप कमी शक्यता असते. त्या विद्यार्थ्यांनी आता प्रत्येक पेपरला १५ मिनिटांचा वाढीव वेळ द्यावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा: लाच घेणे थांबणार! पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्हीत आता ‘ऑडिओ’ रेकॉर्डिंग
सर्व विद्यार्थ्यांचे मत विचारात घेतले का?
वर्णनात्मक प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलून आता आगामी सत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. पण, अचानकपणे हा निर्णय घेण्यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे मत विचारात घेतले का, हा नवा प्रश्न आता समोर आला आहे. ५० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना एका तासात लिहावी लागणार आहेत. एकाच दिवशी विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे पेपर (दररोज पाच पेपर) घेतले जाणार आहेत. त्यामुळे परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांची असली, तरी विद्यार्थ्यांना अभ्यास विस्तृतच करावा लागणार आहे.
Web Title: University Examination Students Do Not Have Extra Time Of 15 Minutes Due To Objective
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..