esakal | ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे निधन

बोलून बातमी शोधा

Birajdar
ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे निधन
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार पवित्र रमजान महिन्यात पैगंबरवासी झाले. आज (गुरुवारी) दुपारी दीड वाजता त्यांनी घरीच देह सोडला. गेल्या महिन्यापासून ते अस्वस्थ होते. मृत्यूसमयी ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा बदिउज्जमा बिराजदार असून ते नावाजलेले गझलकार साबीर शोलापुरी या नावाने प्रसिद्ध आहेत. दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्‍यातील आहेत. सोलापुरातील महानगरपालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यात प्रावीण्य मिळवले. बिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरीत केला आहे. या ग्रंथात एकूण 600 पाने आहेत.

दस्तगीर यांच्या तीनही मुलांची आणि नातीच्या लग्नाची पत्रिका संस्कृतमधून होती. तिच्यात वेदाच्या ऋचांचा समावेश होता. त्यांची पुस्तके वेदादि-शोधबोध, मुस्लिम- संस्कृत- सेवका: "विश्वभाषा' सम्पादकीयमौक्तिकानी, मुस्लिमानां संस्कृताभ्यासो अन्ये चापि लेखा:

बिराजदार यांना एकूण 18 हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांपैकी काही...

 • राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार केंद्र शासन : 1983

 • संस्कृत-पण्डित्याय राष्ट्रपति पुरस्कार : 1998

 • महाराष्ट्र राज्य-संस्कृत-पण्डित-पुरस्कार: महाराष्ट्र विधानसभा : 1993

 • उज्जैनहून परशुरामश्री

 • तिरुपतीहून वाचस्पती

 • नाशिकहून विद्यापारंगत

 • वाराणसी येथून महापण्डित आणि पण्डितेंद्र

 • सोलापूरहून संस्कृतरत्नम्‌

पंडित बिराजदार हे औरंगाबाद येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचे खास निमंत्रित होते. वेदाचे अभ्यासक व संस्कृत पंडित म्हणून तेथे 21 जोनवारी 2018 रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यांचे "संस्कृत लेखक' वर्गातील लेख पुढीलप्रमाणे...

 • अभिनवगुप्त, काशिनाथशास्त्री वासुदेवशास्त्री अभ्यंकर, वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर, अशोक नरहर अकलूजकर

 • केशव रामराव जोशी

 • गुलाम दस्तगीर

 • वासुदेव गोपाळ परांजपे

 • रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी

"मुक्तछंद' संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बिराजदार यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी बिराजदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते मंत्रिमंडळाच्या संपर्कात होते. त्यामुळे "राजकीय नेते फक्त आश्वासने देतात. त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा असली तरी नोकरशाही निर्माण करीत असलेल्या अडथळ्यांमुळे आश्वासनांची पूर्ती होत नाही', असे सांगून बिराजदार म्हणाले होते, शालेय अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृत विषय अनिवार्य करण्याचे आश्वासन तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. या गोष्टीला बरीच वर्षे उलटून गेल्यानंतरही अद्याप कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

अमेरिकेत 20 लाख लोक संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. संस्कृत ही आपल्या देशाची भाषा असून संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बिराजदार यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. अशा या महान संस्कृत पंडितास मुकलो आहोत, अशी सर्वत्र शोककळा दिसून येत आहे.