esakal | उजनीच्या पाण्यासंदर्भातील आदेश रद्द ! जलसंपदामंत्री जयंत पाटलांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

उजनीच्या पाण्यासंदर्भातील आदेश रद्द ! जलसंपदामंत्री जयंत पाटलांची घोषणा

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उजनी (Ujani Dam) जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नव्या प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) काही दिवसांपूर्वी घेतला होता. इंदापूर तालुक्‍यातील (Indapu Taluka) 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला होता. तो निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी आज केली.

हेही वाचा: ग्रामीणमध्ये शुक्रवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाउन !

पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यासाठी देण्याचा निर्णय झाला. परंतु, उजनी धरणाच्या पूर्वी ठरलेल्या पाणी वाटपातील एक थेंबही पाणी इंदापूरसाठी नेण्यात येणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व अन्य बाबींसाठी ठरलेल्या पाण्यातील एक थेंब जरी पाणी इंदापूरला नेले असल्यास मी राजकारण सोडून देईन, असे वारंवार पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. मात्र, सांडपाणी धरणात आल्यानंतर धरणात कितीही पाणीसाठा असल्यास त्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी देण्याचा तो निर्णय होता. त्याला सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला. त्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. त्या वेळी सर्वांनी हा आदेश रद्द करण्याचीच मागणी लावून धरली. त्यासाठी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदा मंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्दची मागणी केली होती. जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाणी प्रश्‍नावरून ढवळल्यानंतर उशिरा का होईना, जलसपंदा मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला.

हेही वाचा: "पक्षाची ओळख बाजूला ठेवून भाजप कार्यकर्ता मराठा आंदोलनात सहभागी होईल !'

सुधारित आदेश काढले जाणार

राज्याच्या जलसंपदा विभागाने 22 एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे नव्या आदेशाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.