esakal | Solapur: उजनीधरणातून सांडव्याद्वारे भीमानदीत पाणी सोडले
sakal

बोलून बातमी शोधा

उजनीधरणातून सांडव्याद्वारे भीमानदीत पाणी सोडले
भीमानदी काठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

उजनीधरणातून सांडव्याद्वारे भीमानदीत पाणी सोडले

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : उजनीधरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने उजनीधरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनीधरणातून सांडव्याद्वारे भीमानदी पात्रात रात्री नऊ वाजल्यापासून पाच हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असून आवश्यकतेनुसार पाण्याच्या प्रवाह कमी अथवा जास्त केला जाणार आहे. त्यामुळे उजनीधरणाच्या खालील बाजूच्या भीमानदी काठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: टेंभुर्णी : ‘विठ्ठलराव शिंदे’ने दिली १०० टक्के एफआरपी

यावर्षी पावसाळ्यात अतिशय संथ गतीने उजनीधरणील पाणी पातळी वाढत होती. त्यामुळे उजनीधरण पूर्ण क्षमतेने केव्हा भरेल, याकडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. पण सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनीधरण यावर्षी 35 दिवसाने उशीरा म्हणजे 5 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भरले. यानंतर उजनीधरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने धरणामध्ये येणारा प्रवाह वाढत गेला. सकाळी नऊ वाजता उजनीधरण 106.49 टक्के भरले होते. उजनीधरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाल्याने उजनीधरणामध्ये येणाऱ्या प्रवाहात वाढ झाल्याने रात्री आठ वाजता उजनीधरण 108.31 टक्के इतके झाले. शनिवारी पुणे शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पुरनियंत्रणाच्या दृष्टीने उजनीधरणातून सांडव्याद्वारे भीमानदी पात्रात पाच हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. उजनीधरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढत राहिल्यास भीमानदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: जिल्ह्यात वाढली ऑक्‍सिजनची मागणी ! टेंभुर्णी, मोहोळ येथील कारखान्यांतून होतेय पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजनची निर्मिती

उजनीधरणाची शनिवारी रात्री नऊ वाजताची पाणी पातळी 497.205 मीटर झाली असून एकूण पाणीसाठा 3447.75 दशलक्ष घनमीटर ( 121.74 टीएमसी) एवढा आहे. त्यापैंकी 1644.94 दशलक्ष घनमीटर ( 58.08 टीएमसी) उपयुक्त पाणी साठा आहे. उजनीधरण 108.42 टक्के भरले आहे. दौंड येथून 8045 क्युसेक्स एवढा प्रवाह उजनीधरणात येत आहे. भीमानदीत पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने भीमानदी काठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे.

loading image
go to top