esakal | लस मिळेनाच ! मागणी पाच लाखांची अन्‌ मिळणार 14 हजार डोस

बोलून बातमी शोधा

corona vaccine
लस मिळेनाच ! मागणी पाच लाखांची अन्‌ मिळणार 14 हजार डोस
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील एकूण 24 लाख सात हजार 901 व्यक्‍तींना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यासाठी केवळ दोन लाख 66 हजार 304 डोस मिळाले आहेत. आता पाच लाख डोसची मागणी करण्यात आली असतानाही केवळ 14 हजार डोस मिळणार आहेत.

ग्रामीण भागात 18 ते 44 वयोगटातील 13 लाख 13 हजार 401 तर शहरात तीन लाख 66 हजार 276 व्यक्‍ती आहेत. तर 45 वर्षांवरील ग्रामीण भागात 10 लाख 94 हजार 500 व्यक्‍ती आहेत. तसेच शहरात या वयोगटातील तीन लाख पाच हजार 229 व्यक्‍ती असून त्यात को- मॉर्बिड रुग्णांचाही समावेश आहे. दोन डोस घेतल्यानंतर संबंधिताला कोरोनाची बाधा झाली, तरीही ऑक्‍सिजन तथा व्हेंटिलेटरविना तो बरा होतो, असे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. दोन डोस घेतलेली एकही व्यक्‍ती कोरोनामुळे दगावलेली नाही. राज्यभर कोरोनाचा प्रसार अजूनही सुरूच असल्याने कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.

हेही वाचा: लसीकरण केंद्रावर नको गर्दी ! घरी बसूनच करा "अशी' ऑनलाइन नोंदणी

लस अपुरी पडत असल्याने सर्वप्रथम पहिला डोस देण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार 304 व्यक्‍तींनी कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे त्यातील 43 हजार 381 व्यक्‍तींनीच दुसरा डोस घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता कोविशिल्ड लसीचे पाच लाख डोस मिळावेत तर कोव्हॅक्‍सिन लसीचे एक हजार डोस मिळावेत, अशी मागणी नोंदविण्यात आली आहे.

जिल्ह्याला मिळाले 852 रेमडेसिव्हीर

शहर- जिल्ह्यासाठी बुधवारी 852 रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन मिळाले आहेत. त्यातील 349 इंजेक्‍शन शहरातील रुग्णांसाठी देण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णांच्या गरजेनुसार पुण्यातून जिल्ह्यासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन मिळत आहेत. 30 एप्रिलनंतर पुरवठा सुरळीत होईल, असा विश्‍वासही जिल्हा प्रशासनाने व्यक्‍त केला. तर ज्या मेडिकलमधून इंजेक्‍शन वितरीत होणार आहेत, त्यांनी रुग्णांच्या नावाची नोंद व त्यांचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत; जेणेकरून इंजेक्‍शनचा काळा बाजार होणार नाही, असा त्यामागे हेतू आहे.

हेही वाचा: सर्वांना उजनीतील पाण्याची चिंता तर कॉंग्रेसचा पालकमंत्रिपदावर डोळा !

लसीकरणाची उद्दिष्टे...

  • 18 ते 44 वयोगट : 16,79,688

  • 45 वर्षांवरील व्यक्‍ती : 13,99,729

  • एकूण उद्दिष्ट : 24,07,901

  • लसीचा पहिला डोस घेतलेले : 2,66,304

  • दुसरा डोस घेतलेले : 43,381

  • लसीची मागणी : 5,00,000

मागणीप्रमाणे लस मिळाल्यास वेळेत उद्दिष्ट पूर्ण होईल

दोन-तीन दिवसांतून एकदा सोलापूर जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात सुमारे 14 लाख व्यक्‍ती 45 वर्षांवरील आहेत. वैद्यकीय कर्मचारी व फ्रंटलाइनवरील कर्मचारी वगळता 45 वर्षांवरील दोन लाख व्यक्‍तींनाच लस मिळाली आहे. त्यासाठी एकावेळी एक लाख डोस मिळावेत, अशी मागणी कळविण्यात आली आहे. परंतु, 14 ते 19 हजारांपर्यंतच डोस मिळत असल्याने एक-दोन दिवसांनंतर केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

"आरोग्य' सभापतींचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

जिल्हा परिषदेचे आरोग्य समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांनी लसीकरण व कोरोनासंबंधीचा आढावा घेतला. त्या वेळी जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविण्यात येईल. लस उपलब्ध होण्यासाठी अजित पवार यांच्याशी संपर्क करून लस मिळेल असा प्रयत्न केला जाईल.