esakal | नॉट रिचेबल भालके यांनी द्यावा 'विठ्ठल'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा : युवराज पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

नॉट रिचेबल भालके यांनी 'विठ्ठल'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा : युवराज पाटील

"विठ्ठल'च्या कामगारांचे पेमेंट देण्यात भगीरथ भालके हे असमर्थ ठरले आहेत, त्यामुळे त्यांनी नैतिकता स्वीकारून कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संचालक युवराज पाटील यांनी केली.

भालके यांनी द्यावा 'विठ्ठल'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा : युवराज पाटील

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (Shri Vitthal Sugar Factory) सभासद, कामगार, वाहतूक ठेकेदार यांचे पेमेंट देऊन कारखाना सुरू करू, असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी संचालक मंडळाला दिले होते; परंतु पेमेंट देण्यात भगीरथ भालके हे असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकता स्वीकारून कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांचे नातू व विद्यमान संचालक युवराज पाटील (Yuvraj Patil) यांनी केली आहे.

हेही वाचा: 'या' निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद?

श्री. पाटील म्हणाले, 23 ऑगस्ट रोजी कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष भगीरथ भालके यांनी घेतली होती. त्या वेळी कारखाना सुरू करण्यासाठी सुमारे 70 ते 100 कोटी रुपये लागणार आहेत. कारखान्याचे सभासद, कामगार, वाहतूक ठेकेदार यांची देणी देण्यासाठी खासगी फायनान्स किंवा खासगी व्यक्तीकडून 31 ऑगस्टपर्यंत निधीची व्यवस्था केली जाईल, असे भगीरथ भालके यांनी सांगितले होते. परंतु, मुदत उलटून गेली तरीही अद्याप पेमेंटची व्यवस्था करण्यात भालके हे असमर्थ ठरले आहेत. निष्क्रिय ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर न राहता पदाचा राजीनामा देऊन संचालक मंडळाच्या हाती कारभार सोपवावा. संचालक मंडळ कारभार करण्यास समर्थ आहे.

हेही वाचा: उद्योजक बनविणारा उद्योजक! प्रतिकूल परिस्थितीत उभारल्या पाच कंपन्या

कारखान्याचे सभासद, शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार यांना पेमेंट मिळालेले नसल्याने या सर्वांमध्ये नाराजी आहे. माजी आमदार (कै.) भारत भालके हे दमदार आमदार होते. त्यांनी उशिरा का होईना कारखाना सुरू करण्यासाठी पेमेंटची व्यवस्था केली होती. त्याच पद्धतीने भगीरथ भालके हे पेमेंटची व्यवस्था करतील, असे आम्हाला वाटले होते. परंतु ते पेमेंटची व्यवस्था करू शकलेले नाहीत. ते नॉट रिचेबल असतात. त्यांनी आधी रिचेबल व्हावे. संचालक मंडळाच्या तरी संपर्कात यावे आणि कारखाना चालू करण्यास असमर्थ ठरल्याने नैतिकता स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.

(कै.) औदुंबरअण्णा पाटील, (कै.) यशवंतभाऊ पाटील, (कै.) कृष्णातभाऊ पुरवत, (कै.) सुधाकरपंत परिचारक, (कै.) वसंतराव काळे आणि अन्य ज्येष्ठ मंडळींनी कारखान्याची उभारणी केली; परंतु त्यांच्या परिश्रमाला गालबोट लावले जात आहे. त्यामुळे आम्हाला त्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

loading image
go to top