
Sangli : स्थायी समिती सदस्य पांडुरंग कोरे यांचा राजीनामा
सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे भाजपचे स्थायी समिती सदस्य पांडुरंग कोरे यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा आयुक्तांकडे सोपवला. त्यांच्या जागी आता भाजपकडून नवीन सदस्याला संधी देण्यात येईल.
भाजपचे नगरसेवक असलेले पांडुरंग कोरे यांची गतवर्षीच स्थायी समितीवर निवड झाली होती. त्यानंतर त्यांना सभापती पद दिले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या उर्वरित एक वर्षांच्या मुदतीसाठी आता भाजपकडून नवीन सदस्याला संधी देण्यात येईल.
हेही वाचा: डॉक्टर महिलेचा विनयभंग; महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक
तीन वर्षापूर्वी महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच वर्षी स्थायी समितीवर पांडुरंग कोरे यांची भाजपने निवड केली होती. मात्र दुसऱ्या वर्षी ड्रॉ द्वारे राजीनामा घेण्यात आलेल्या आठ सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यामुळे एक वर्षातच त्यांना स्थायी समितीमधून बाहेर पडावे लागले. गतवर्षी पक्षाने पुन्हा कोरे यांना स्थायी समितीवर संधी दिली आणि सभापतिपदी बसवले. त्यावेळीच त्यांना एक वर्षासाठी स्थायीमध्ये संधी दिल्याची चर्चा होती. गेल्याच महिन्यात श्री. कोरे यांची सभापती पदाची मुदत संपुष्टात आली.
हेही वाचा: इंदापूर : सणसर-मानकरवाडी रस्त्याला २७ गतीरोधक...
समितीच्या नवीन आठ सदस्यांच्या निवडी झाल्या त्याच बरोबर निरंजन आवटी यांची नूतन सभापती म्हणून निवड झाली. यानंतर आज पांडुरंग कोरे यांनी सदस्यत्वाचा राजीनामा आयुक्तांकडे दिला.
कोरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर एक वर्षासाठी भाजपकडून नवीन सदस्यांना संधी देण्यात येईल. येत्या महासभेत भाजपकडून नवीन सदस्याचे नाव जाहीर केले जाणार आहे.