माहिती असू द्या...राज्य बॅंकेचे प्रशासकीय सदस्य महागावकर यांचा राजीनामा 

avinash mahagavkar
avinash mahagavkar

सोलापूर : राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय अविनाश महागावकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांची नियुक्‍ती झाली होती. पंपरेनुसार आधीच्या सरकारच्या काळातील नियुक्‍त्या नवे सरकार आल्यानंतर बदलल्या जातात. 


तोट्यातील राज्य बॅंकेचा गेली पाच वर्षे नफ्याचा कारभार सुरु असून नजिकच्या काळात बॅंकेवर निवडणुकीच्या माध्यमातून लोकनियुक्‍त संचालक आणण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मर्जीतील प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधन अनास्कर व सदस्य संजय भेंडे यांचीही पदे औटघटकेची ठरणार असे चित्र आहे. आर्थिक गैरकारभारामुळे 2001 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रशासकांची नियुक्‍ती केली होती. एम. एल. सुखदेवे हे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष तर ए. ए. मगदूम, के. एन. तांबे सदस्य होते. त्या वेळी सुमारे दोन हजार कोटींच्या तोट्यातील बॅंक प्रशासकीय मंडळाच्या कार्यकाळात नफ्यात आली. 2014 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजपच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राज्य सरकारने राज्य बॅंकेच्या प्रशासक मंडळावर विद्याधर अनास्कर, संजय भेंडे, अविनाश महागावकर यांची सदस्य म्हणून नियुक्‍ती केली. बॅंकेच्या कामकाजातील हस्तक्षेपामुळे डॉ. सुखदेवे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनास्कर यांची अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली. आता सरकार बदलल्याने आपली नियुक्‍ती रद्द होण्याची नामुष्की ओढावण्याऐवजी महागावकर यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. 


बॅंक आता नफ्यात 
शिखर बॅंक म्हणून राज्याच्या सहकार क्षेत्रात राज्य सहकारी बॅंकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 2011 पर्यंत आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारांमुळे बॅंक आर्थिक दिवाळखोरीत गेली. गैरव्यवहारप्रकरणी बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह आजी- माजी मंत्री, आमदार, खासदार असलेल्या तब्बल 76 संचालकांची चौकशी सुरु आहे. संचालक मंडळाच्या काळात 31 मार्च 2011 अखेर बॅंकेचे बुडीत कर्जे सुमारे दोन हजार 919 कोटी इतके होते. तर 2010 मध्ये बॅंक 775 कोटी रुपयांच्या तोट्यात होती. आता मागील काही वर्षांपासून बॅंक नफ्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com