सोलापूर : राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी 8 जानेवारीला देशव्यापी संप केला जाणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती सरकारी-निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीचे राज्य संघटक व निमंत्रक शंकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी (ता. 8) सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
हेही आवश्य वाचाच...खुषखबर...कर्जमाफीची रक्कम मार्चपर्यंत खात्यात होणार जमा
युती सरकार असो की आघाडी सरकार, यांच्याकडे सातत्याने मागणी करुनही शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे 'हम सब एक है'चा नारा देत नववर्षात देशव्यापी संपाचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या संपात सोलापुरातील सरकारी व निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संपात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. या पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष विरुपाक्ष घेरडे, कार्याध्यक्ष अमृतराव कोकाटे, कोशाध्यक्ष नामदेव थोरात, राजेश देशपांडे, चन्नय्या स्वामी, शिवानंद चडचण, रमाकांत साळुंखे, हरिदास गायकवाड, अशितोष नाटकर, सी. एस. स्वामी, भीमराव लोखंडे, गोविंद पाटील उपस्थित होते.
हेही आवश्य वाचाच...भारीच...जुळे सोलापुकरांनी मानले 'सकाळ'चे आभार
या आहेत मागण्या...
- केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना भत्ते लागू करावेत
- कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता विनाविलंब द्यावा
- कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे
- महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची संगोपन रजा द्यावी
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा
- अनुकंपा तत्त्वावरील सर्व उमेदवारांना नोकरीत सामावून घ्यावे
- राज्य शासनाच्या विविध विभागांतील खासगीकरण रद्द करावे
- प्राथमिक आरोग्य केंद्रांतील महिला परिचरांना किमान वेतन द्यावे
- उत्कृष्ट कामासाठी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ द्यावी
|
|