कोल्हापुरातील भाजपच्या 'या' सत्ताकेंद्रांना बसणार हादरे 

कोल्हापुरातील भाजपच्या 'या' सत्ताकेंद्रांना बसणार हादरे 

कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दणका, त्यानंतर बहुमत सिद्ध होणार नाही याची झालेली खात्री, यामुळे अवघ्या तिसऱ्या दिवशीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार येणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. या संभाव्य नव्या समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचीही समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद, महापालिकेसह जिल्हा दूध संघ (गोकुळ), बाजार समिती, सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटणार आहेत. 

लोकसभा निवडणूक महायुतीच्या जोरावर प्रा. संजय मंडलिक यांनी लढविली आणि ते दोन लाख 70 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. कालपर्यंत एकत्रित असणाऱ्या भाजप - शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फटका विधानसभा निवडणुकीत युतीला बसला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदानाआधी आठवडाभर महायुतीशी गद्दारी करणाऱ्यांनी मेळावे घेऊन पाठिंबा जाहीर करावा, असे आवाहन केले होते.

तक्रारी थेट मातोश्रीवर

शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधातील तक्रारी थेट "मातोश्री'वर झाल्या. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी लढण्याऐवजी शिवसेना-भाजप आपसांत लढले आणि त्याचा फटका राधानगरी, भुदरगड वगळता अन्य नऊ विधानसभा मतदारसंघांत बसला. शिवसेनेच्या पाच, तर भाजपच्या दोन आमदारांचा पराभव झाला. 

प्रा. मंडलिकांचे गणित राज्यातही लागू

लोकसभा निवडणुकीत खासदार प्रा. मंडलिक यांच्या प्रचारात कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रिय होते. मंडलिक यांनी शिवसेना, कॉंग्रेस - राष्ट्रवादी असे गणित जुळवून आणले होते. तेच गणित राज्याच्या राजकारणातही लागू झाले आहे. 

जिल्हा परिषदेत पडसाद

जिल्हा परिषदेत भाजपच्या शौमिका महाडिक अध्यक्ष आहेत. त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा मोठा वाटा महाडिक यांच्या अध्यक्षपदात होता. आता भाजपने काडीमोड घेतल्याने जिल्हा परिषदेत शिवसेना भाजपपासून अलिप्त होईल. तेथेही नवे समीकरण अस्तित्वात येईल. स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टीही सत्तेत फार काळ राहतील अशी चिन्हे नाहीत. 

महापालिकेत हे शक्य

महापालिकेत शिवसेनेचे चार सदस्य नेहमी कॉंग्रेस - राष्ट्रवादीसोबत राहिले आहेत. महापौर निवडीवेळी ते तटस्थ राहण्याची भूमिका घ्यायचे. आता ते उघडपणे दोन्ही कॉंग्रेसच्या बाजूने राहतील. त्यामुळे कॉंग्रेस - राष्ट्रवादीकडे 48 संख्याबळ होईल. विरोधी आघाडीकडे 33 संख्याबळ आहे. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव व बंधू संभाजी जाधव भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांनी अलिकडेच महापौर निवडणुकीत भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला; पण पुढच्यावर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत हे दोघेही कॉंग्रेसच्या गोटात असतील. 

गोकुळ निवडणुकीत मंडलिक यांच्या भूमिकेला महत्त्व

जिल्ह्याचे राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा दूध संघात (गोकुळ) भाजपला स्थान नव्हते. मंत्री पाटील राज्याच्या राजकारणाचे पहिल्या फळीतील नेते बनले आणि "गोकुळ'मध्ये बाबा देसाई यांना संचालक मंडळात स्थान द्यावे लागले. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांची "गोकुळ'वर सत्ता आहे. शिवसेनेच्या रूपाने खासदार मंडलिक यांची भूमिका येत्या निवडणुकीत महत्त्वाची ठरेल. 

महाडिक यांना पटका बसणार

भाजप सरकारमध्ये नसल्याचा फटका महाडिक यांच्या राजकारणाला बसणार आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापूर दक्षिणमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले अमल महाडिक यांचा पराभव झाला आहे. ज्यांच्या जोरावर त्यांचे राजकारण होते, तोच भाजप आता सरकार स्थापन करणार नाही. साखर कारखाने, सहकारी संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले होते. भाजपच्या सत्तेमुळे या बालेकिल्ल्यांना पाच वर्षांत सुरुंग लागला. सहकारी कारखानदारीत थेट नसेना; पण भाजपने प्रवेश केला. कधी नव्हे ती भाजप ग्रामपंचायतीपर्यंत पोचली. आता या स्थानांनाही धक्का बसण्याची चिन्हे आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुका नव्या समीकरणानुसारच होतील. 

शांत बसणे हाच पर्याय

भाजपच्या मेगा भरतीत राज्यातील अन्य नेते गळाला लागत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मात्र महाडिक कुटुंबीय वगळता अन्य कुणी गळाला लागले नाहीत. समरजितसिंह घाटगे भाजपतर्फे नवा चेहरा म्हणून उदयास आले. त्यांना तिकीट नाकारल्यानंतर कागलमधून ते अपक्ष लढले आणि त्यांचा पराभव झाला. माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, अनिल यादव यांच्यासारखी मंडळी हाताला लागली. चंदगडमधून शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांना तिकीट मिळाले आणि भरमू पाटील यांना शांत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. राधानगरी, भुदरगडमधून राहुल देसाई यांची अशीच पंचाईत झाली. केंद्रात तसेच राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यातही भाजप फॉर्ममध्ये होती. आता मात्र राजकारणाचे संदर्भ बदलण्याची शक्‍यता आहे. 

आवाडे, कोरेंना पुन्हा धक्का 

तीन दिवसांतील घडामोडींवरून भाजपला पाठिंबा दिलेल्या माजी मंत्री प्रकाश आवाडे व डॉ. विनय कोरे यांना संधी मिळण्याची शक्‍यता होती. परंतु, आज भाजप सरकार स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे घाईगडबडीत भाजपकडे गेलेल्या श्री. आवाडे यांच्यासह डॉ. कोरे यांनाही फटका बसणार आहे. अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविले. 

जिल्ह्याचा पॅटर्न राज्यात 

विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असा जिल्ह्यातील पॅटर्न राज्यात येईल, अशी चर्चा होती; पण अचानक झालेल्या घडामोडींमुळे ही शक्‍यता मावळली होती. आज भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने राज्यात पुन्हा जिल्ह्याचा पॅटर्न येणार हे स्पष्ट झाले. कोल्हापूर महापालिकेत सुरू झालेला हा पॅटर्न लोकसभेतही कायम राहिला. जिल्हा परिषदेत सेनेचा एक गट भाजपसोबत होता. नव्या समीकरणांमुळे हा गटही आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत येण्याची शक्‍यता आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com