Satish Jarkiholi : शाहू महाराजांचा पुतळा बेळगावमध्ये उभारणार - सतीश जारकीहोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Statue of Shahu Maharaj to be erected in Belgaum Satish Jarkiholi

Satish Jarkiholi : शाहू महाराजांचा पुतळा बेळगावमध्ये उभारणार - सतीश जारकीहोळी

बेळगाव : राजर्षी शाहू महाराज यांचा बेळगावात पुतळा उभारण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचा आदेश कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज दिला. महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यांची ही जबाबदारी आहे, त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी, असेही ते म्हणाले.

पुतळा उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी सहा वर्षांपूर्वी मंजूर केला आहे, मग अद्याप पुतळा उभारणी का झाली नाही? असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे पुतळा उभारणीसाठी महापालिका आयुक्तांना कार्यवाही करावी लागणार आहे.

महापालिका कार्यालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळाही उभारावा, असे त्यांनी सांगितले. शहरात राजर्षी शाहू महाराज व गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय २०१८ मध्ये महापालिकेत झाला होता. पुतळा उभारण्यासाठी त्यावेळी एक समिती स्थापन केली होती.

विशेष म्हणजे मंत्री जारकीहोळी हेच त्या समितीचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश करताना केएलई हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावर शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय त्या वेळी झाला होता. पण, महामार्गाचे सहापदरीकरण होणार असल्याने त्याबाबत महामार्ग प्राधिकरणकडून ना-हरकत घेण्याचे निश्‍चित झाले होते.

दरम्यान, मार्च २०१९ मध्ये लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपला. त्यामुळे पुतळा उभारणीचा प्रस्ताव रखडला होता. गौतम बुद्ध यांचा पुतळा किल्ला तलावात उभारण्याची मागणी दलित संघटनांची होती; पण तलावात पुतळा उभारणे शक्य नसल्याचे कारण त्या वेळी महापालिकेकडून दिले होते.

आता काँग्रेसची सत्ता आल्यावर व जारकीहोळी हे मंत्री झाल्यावर शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव मार्गी लागणार आहे. या पुतळ्यासाठी एक कोटी रुपये निधी राखीव असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. २०१७ मध्ये महापालिकेच्या मुख्य सभागृहात राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा लावली. पण, महाराजांचा पुतळा बेळगावात उभारला जावा, यासाठी जारकीहोळी प्रयत्नशील आहेत. आधी ज्या जागेवर पुतळा उभारण्याचा निर्णय झाला होता, त्या जागेत एका खासगी संस्थेकडून सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे त्याच जागेत पुतळा उभारला जाणार की पर्यायी जागा निवडली जाणार, हे पाहावे लागणार आहे.

एक नजर

  • शाहू महाराज व गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय २०१८ मध्ये

  • त्या वेळी पुतळा उभारण्यासाठी समिती स्थापन

  • मंत्री जारकीहोळी हेच समितीचे अध्यक्ष

  • केएलई हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावर पुतळा उभारण्याचा निर्णय

  • तातडीने पुतळा उभारणीचे काम होणार

टॅग्स :Chhatrapati Shahu Maharaj