काश्‍या सोन्यासाठी झाला कर्दनकाळ; सहा महिलांच्या खुनाचे प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

सावज हेरून त्याला लुबाडण्याची मानसिकता असलेला संशयित काश्या काळे अत्यंत चलाख आहे. त्यामुळेच चार वर्षांपासून सतत पोलिसांनाही आव्हान देणारा ठरतो आहे. चोऱ्यांसह खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांचीही दमछाक होताना दिसते. त्यामुळे काश्‍या रॉबरीच्या खटल्यात सापडतो अन्‌ खुनाच्या गुन्ह्यात सुटतो, हेही वास्तव आहे. एक दोन नव्हे तर तब्बल पाच खून, चार हाफ मर्डर, चंदन चोरीसह रॉबरीसारखे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.

कऱ्हाड  : सोन्याच्या हव्यासापायी महिलांच्या खुनाचा कर्दनकाळ बनलेला हजारमाची येथील काशिनाथ गोरख काळे याला पुन्हा मसूर येथे निर्दयीपणे महिलेच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल सहा महिलांना यमसदनी पाठवणाऱ्या काशिनाथ काळे ऊर्फ काश्‍या महिलांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. गळ्यातील सोन्याच्या गंठणासाठी काश्‍याने चार वर्षांत सहा महिलांचा खून केला आहे. त्याशिवाय पाच गुन्ह्यांत महिलांना गंभीर जखमी करून सोने पळवले आहे. चंदनचोरीसारखे अन्य काही गुन्हेही त्याच्या नावावर दाखल आहेत.
 
पोलिसांची सतर्क नजर आणि खबऱ्यांच्या नेटवर्कला भेदून काशिनाथ काळे हा अट्टल गुन्हेगार तयार झाला आहे. चार वर्षांपासून त्याच्या गुन्ह्यांची मालिकाच सुरू आहे. मात्र, पोलिस त्याला आवर घालू शकले नाहीत. सहापेक्षाही जास्त गुन्ह्यांत त्याला अटक झाली होती. त्याला दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षाही झाली आहे. तो गजाआड होता. त्यावेळी भोगलेली शिक्षा व नंतर मिळालेली शिक्षा भोगून तो महिन्यापासून जामिनावर आहे. गळ्यातील सोनेरी दागिना दिसला की, सैरभैर होणाऱ्या काश्‍याचे कारनामे पुन्हा सुरू झाले. रानात एकटे काम करणाऱ्या महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील दागिने लंपास करायचे. त्यासाठी त्या महिलेला जिवंतही मारायला तो कमी करत नाही. कऱ्हाडचा पवार मळा, औंध, जखिणवाडी, वडोली निळेश्वर, मलकापूरसह कालच्या माळवाडी (मसूर) येथे महिलांचे खून करून त्यांच्या गळ्यातील दागिने काश्‍याने लंपास केल्याचे वास्तव पोलिसांसमोर आहे. त्यापूर्वीच मागील महिन्यात सुर्लीत एका ज्येष्ठ महिलेच्या डोक्‍यात दगड घालून तिच्या गळ्यातील सोने लंपास झाले होते. त्याही तपासात काश्‍याच असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्रतिकार करणाऱ्या महिलांचे थेट खून करणारा काश्‍या सोन्यासाठी महिलांचा कर्दनकाळ बनला आहे. 
सहा वेगवेगळ्या चोरीच्या निमित्ताने काश्‍याने हे खून केले. महिलांच्या गळ्यातील त्याने लंपास केलेल्या दागिन्यांसह पैसे व अन्य असा सगळा ऐवज मिळून त्याने दहा ते बारा तोळे दागिने लंपास केले आहेत. 
वडोली निळेश्‍वर येथील खून प्रकरणात कऱ्हाड तालुका पोलिसांनी त्याचे भिंग फोडून त्याला गजाआड केला. मात्र, त्यानंतर सलग पाच खटले त्याच्यावर सुरू होते. वास्तविक प्रत्येक चोरीतील सोने पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, त्याला शिक्षा होईपर्यंत पोलिसांचा तपास जाताना दिसत नाही. माळवाडीच्या गुन्ह्यातील सोने काश्‍याने येथील सराफाला विकले होते. तेही पोलिस जप्त करतील. मात्र, मागील गुन्ह्यात जामीन मिळून महिना व्हायच्या आतच काश्‍याच्या कारनाम्याने पोलिस दलाची झोप मात्र उडवली आहे. 

विरोध झाला की, जीवच घ्यायचा 

अत्यंत निर्दयीपणे मारून प्रत्येक गुन्ह्यात काश्‍याने सोने लंपास केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. दगड, वीट, तार, कोयता, काठीसारख्या हत्याराने काश्‍या हल्ला करतो. महिलांच्या डोक्‍यात पहिला वार करतो. दुसऱ्या क्षणाला गळ्यातील गंठण लंपास करतो. विरोध झाला नाही, तर त्या महिलेवर दुसरा वार करत नाही. विरोध करणाऱ्या महिलेचा जीव जाण्यापर्यंत तो एकसारखे वार करतो. त्यानंतर महिलेचा मोबाईल डीस्ट्रॉय करतो. कालच्या माळवाडीच्या गुन्ह्यातही हीच पद्धत त्याने वापरल्याचे पोलिस तपासात दिसून येत आहे. 

चलाख काश्‍या... 

सावज हेरून त्याला लुबाडण्याची मानसिकता असलेला संशयित काळे अत्यंत चलाख आहे. त्यामुळेच चार वर्षांपासून सतत पोलिसांनाही आव्हान देणारा ठरतो आहे. चोऱ्यांसह खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांचीही दमछाक होताना दिसते. त्यामुळे काश्‍या रॉबरीच्या खटल्यात सापडतो अन्‌ खुनाच्या गुन्ह्यात सुटतो, हेही वास्तव आहे. एक दोन नव्हे तर तब्बल पाच खून, चार हाफ मर्डर, चंदन चोरीसह रॉबरीसारखे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत.

नक्की वाचा : साताऱ्याचे 'हे' नेते चालले पुन्हा राष्ट्रवादीत

वाचा : साताऱ्यातील डॉक्‍टर महिलेस नवऱ्याला मारुन टाकण्याची धमकी

हेही वाचा : सातारा : खाकी वर्दीतील मुर्दाडपणा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story Of Kashinath Kale Who Is Suspected For Killing Six Women