साताऱ्यातील डॉक्‍टर महिलेस नवऱ्याला मारुन टाकण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नवऱ्याला मारुन टाकण्याबराेबरच खंडणी देखील मागण्यात आली. यामुळे कुटुंब माेठ्या प्रमाणात तणावात गेले. अखेर या प्रकाराचा छडा लागावा यासाठी घाबरलेल्या महिला डाॅक्टरने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.  

सातारा : येथील एका रुग्णालयातील डॉक्‍टरला जीवे मारण्याची धमकी देत, खंडणी मागितल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डॉ. नीलेश विठ्ठलराव थोरात (रा. प्रभुकृपा बिल्डिंग, सदरबझार, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
 
21 जानेवारीला थोरात यांच्या पत्नी डॉ. रश्‍मी त्यांच्या कामाक्षी हॉस्पिटलमध्ये होत्या. त्या वेळी त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तींनी ""तुझ्या नवऱ्याचे अफेअर सुरू आहे, आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही,'' अशी धमकी देत फोन ठेवला. त्यानंतर त्याच क्रमांकावरून तुझ्या नवऱ्याला व कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत खंडणी मागणारा मेसेज काल डॉ. रश्‍मी यांच्या मोबाईलवर आला. या प्रकाराने घाबरल्याने त्यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. हवालदार संतोष इश्‍टे तपास करत आहेत. 

विनयभंगप्रकरणी जकातवाडीच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

सातारा : जागेच्या मोजणीचे पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणातून जकातवाडी (ता. सातारा) येथील महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सागर मधुकर सपकाळ, भारती सपकाळ व त्यांची आई (सर्व रा. जकातवाडी, ता. सातारा) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळी संशयितांनी घरात शिरून मोजणीचे पैसे मागितले. त्याला नकार दिल्यामुळे संशयितांपैकी दोन अनोळखी तरुणांनी विनयभंग केला, तसेच मारहाण केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक फौजदार ए. एन. वाकडे तपास करत आहेत. 

तडीपारी आदेश भंगप्रकरणी एकास अटक 

सातारा : तडीपारी आदेशाचा भंग करून साताऱ्यात फिरणाऱ्याला शहर पोलिसांनी काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अटक केली आहे. संकेत दिनेश राजे (रा. सदरबझार, सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सातारा शहर, तालुका, शाहूपुरी पोलिस ठाण्यात घरफोडीसह विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्याला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे, तरीही तो शहरात फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी त्याला अटक केली.

वाचा : पोलिसांची तुफान कामगिरी; संशयित खूनी ताब्यात

वाचाच: व्हॅलेंटाईन डे पुर्वीच त्याला जेलची हवा; गर्भ वाचला

नक्की वाचा : मंत्री महाेदय जाताच त्यांनी खाटा केल्या रवाना

अवश्य वाचा : साताऱ्याचे 'हे' नेते चालले पुन्हा राष्ट्रवादीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News Of Satara District