पुन्हा रणधुमाळी! 'या' सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाकडे माहिती सादर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

जिल्ह्यातील ब वर्गातील 22, क वर्गातील 55 आणि ड वर्गातील 415 अशा एकूण 492 सहकारी संस्थांची निवडणूक डिसेंबर महिन्यातच होणे अपेक्षित होते. या निवडणुकीसाठी काही संस्थांकडून निवडणुकीबाबत प्रतिसाद न मिळाल्याने या संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

सोलापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनी गाव पातळीवरील प्रचाराच्या तोफा पुन्हा धडाडणार आहेत. डिसेंबरमध्ये निवडणुकीला पात्र असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 492 सहकारी संस्थांची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पाठविण्यात आली आहे. जानेवारीत या संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. 

हेही वाचा : विश्वास ठेवा! संस्था नोंदणी होते फक्त ५३ रुपयांतच
प्रतिसाद न मिळाल्याने

जिल्ह्यातील ब वर्गातील 22, क वर्गातील 55 आणि ड वर्गातील 415 अशा एकूण 492 सहकारी संस्थांची निवडणूक डिसेंबर महिन्यातच होणे अपेक्षित होते. या निवडणुकीसाठी काही संस्थांकडून निवडणुकीबाबत प्रतिसाद न मिळाल्याने या संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. संस्थांनी वेळेत मतदार यादी तयार केली नाही. मतदार यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविली नाही. त्यामुळे निवडणुका घेण्यास विलंब लागला आहे. या निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. 

हेही वाचा : पुरावे दिल्यास मी तत्काळ राजीनामा देईन : राम सातपुते
या संस्थांच्या होणार निवडणुका 

जानेवारी ते मार्च या कालावधीत सोलापूर शहरातील डाक कर्मचारी सेवक पतसंस्था आणि अंगणवाडी कर्मचारी पतसंस्था, बार्शी नगरपालिका को-ऑप. सेवक पतसंस्था, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ सेवक पतसंस्था आणि नर्मदेश्‍वर शिक्षण प्रसारक सेवक पतसंस्था, मळेगाव या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासह जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा कालावधी पूर्ण होत आहे. 

हेही वाचा : साहेब, आम्ही व्याजाने पैसे काढतो
मार्च अखेरपर्यंत 184 संस्थांच्या निवडणुका 

सोलापूर जिल्ह्यातील ब वर्गातील 79 संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारीत पूर्ण होत आहे. फेब्रुवारीमध्ये 65 तर मार्चमध्ये 40 सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत पूर्ण होत आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत जिल्ह्यातील 184 संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत पूर्ण होत असून या संस्था निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. सेवक पतसंस्था आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Submission of information to the Authority for the election of 'these' co-operatives