येरळा कोरडी, द्राक्षबागा संकटात ; शेती वाचविण्यासाठी शेतकरी घालतोय साद

summer impact yerla river sangli then grapes garden collapse sangli farmer marathi news
summer impact yerla river sangli then grapes garden collapse sangli farmer marathi news

येळावी (सांगली)  :  तासगाव पश्‍चिम भागास वरदान ठरत असलेली व बारमाही झालेली येरळा सध्या ऐन उन्हाळ्यात कोरडी पडल्याने राजापूर, तुरची, ढवळी  व निमणी परिसरातील येरळाकाठची ऊस व द्राक्षशेती पाण्याविना धोक्‍यात आली आहे. कोरोना विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर हे पाण्याचे दुसरे संकट उभे आहे. शेती वाचविण्यासाठी कण्हेर धरणातील आरफळ योजना किंवा ताकारी योजनेचे पाणी निमणी येथील बंधारा भरेपर्यंत येरळेत सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

येरळा नदीवर निमणी व वसगडे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. निमणी बंधाऱ्यात १३ फूट उंचीचा जलसाठा करण्याची सोय आहे. बंधाऱ्याची साठवण क्षमता २७ दशलक्ष घनफूट आहे. या जलसाठ्यावर मंजूर क्षेत्र २१५ हेक्‍टर आहे. यंदा मोसमी पाऊस समाधानकारक झाल्याने व एकदा आरफळ योजनेचे पाणी सोडल्याने निमणी व वसगडे येथील दोन्ही बंधारे वेळेत भरल्याने येरळेकाठचा रब्बी हंगाम यशस्वी होऊ शकला. दोन महिन्यापासून येरळा कोरडी पडली आहे. निमणी येथील बंधारा कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. येरळाकाठ परिसरातील सर्व विहिरी व कुपनालीकेतील पाणी पातळी खालावल्याने बागायत शेती धोक्‍यात आली आहे.

पाच महिन्यांपूर्वी येरळा काठावरील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार खासदार संजय पाटील व आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रयत्नातून आरफळचे पाणी सोडण्यात आले. रब्बी हंगाम व्यवस्थित पार पडला. निमणी बंधाऱ्याच्या परिसरातच द्राक्षबागा व ऊसशेतीचे प्रमाण लक्षणीय आहे. परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या बागांची खरड छाटण्यास लवकरच सुरवात होणार आहे. द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. अशा वेळेस द्राक्ष बागांना पाणी न मिळाल्यास पुढील द्राक्ष हंगाम धोक्‍यात येणार आहे. सदर द्राक्षबागा व इतर बागायत शेती वाचवण्यासाठी पाटबंधारे विभागाने निमणी व वसगडे येथील बंधारे पूर्णपणे भरेपर्यंत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

 आरफळच्या पाण्याने दोन बंधारे समाधानकारकरित्या भरल्यास निमणी बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून पाण्यावर अवलंबून असणाऱ्या निमणी, तूरची, ढवळी भागातील द्राक्ष व ऊस शेतीस जीवदान मिळणार आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. येरळाकाठावरील बागायत शेती वाचवण्यासाठी निमणी, तुरची ग्रामपंचायतीनी पाटबंधारे विभागाकडे येरळेत आरफळ किंवा ताकारी योजनेचे पाणी सोडण्याबाबत मागणीपत्र दिले आहे. सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही पत्र दिले आहे.  पाटबंधारे विभागाने येरळेत आरफळचे पाणी त्वरीत सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com