'रोहितने माझ्या नावाचा उल्लेख केला हे माझ्यासाठी...' : सुनंदा पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आमदाराने शपथ घेताना आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे रोहित पवार हे सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरले आहेत.

बारामती शहर : 'इतर प्रत्येक ठिकाणीच नाव घेताना वडिलांच्या नावाचा उल्लेख होतो, आज मात्र आपल्या जीवनाची वेगळी सुरवात करताना रोहितने आठवणीने माझ्या नावाचा उल्लेख केल्याने मला खूप बरं वाटलं. आपल्या मुलाने एका महत्त्वाच्या क्षणी आपली आठवण ठेवून नावाचा उल्लेख करणे, ही गोष्ट मला समाधान देणारी ठरली, अशा शब्दांत सुनंदा पवार यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

रोहित पवार या पवार कुटुंबियातील तिसऱ्या पिढीने आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेताना 'मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार' अशी सुरवात केल्याने मला सुखद धक्का बसला होता, अशा शब्दांत रोहित पवार यांच्या आई सुनंदा यांनी त्याचे वर्णन केले.

- वार झाला मुंबईत आणि जखम झाली दिल्लीला

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आमदाराने शपथ घेताना आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे रोहित पवार हे सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरले आहेत. मुलाच्या जडणघडणीत आईचे स्थान नेहमीच वेगळे असते, पण मुलाने आठवण ठेवून त्याचा उल्लेख विधीमंडळात करण्याने मला खूप छान वाटले. रोहितने समाजासाठी आदर्श असे काम करावे, अशी माझी इच्छा असल्याचे सुनंदा पवार यांनी म्हटले आहे. 

- रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंना मिळणार 'ही' मंत्रीपदं?

त्या पुढे म्हणाल्या, तब्येत ठीक नसल्याने मला शपथविधीला जाता आले नाही. मात्र, कुटुंबातील इतर सदस्य शपथविधीसाठी उपस्थित राहिले होते. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून कुटुंबात बरेच चढ-उतार आले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ती आता पूर्ववत झाली आहे. आमचं कुटुंब एक आहे आणि यापुढेही राहिल. 

- अजित पवारांना मिळणार 'हे' पद; आघाडीच्या बैठकीला हजर

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून रोहित पवार निवडून आले. भाजप नेते राम शिंदे यांचा त्यांनी पराभव केला. आणि आज आमदारकीची शपथही घेतली. मात्र, या शपथविधीवेळीही त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunanda Pawar comment about her son NCP MLA Rohit Pawar