सरकारने शेतकऱ्यांना मदत नाही 'आवळा' दिला ; चंद्रकांत पाटील

काळी फीत बांधून निषेध नोंदवणार!
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलsakal

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना हवी तशी मदत मिळाली नाही, त्यामुळे जनता संतप्त आहे. शेतकऱ्यांना मदत नाही तर फक्त आवळा मिळाला, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केली.येथील प्रभाग क्रमांक पाच मधील विविध विकासकामांच्या पाहणीसाठी ते इस्लामपुरात नगरसेवक विक्रम पाटील यांच्या विनंतीनुसार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, "राज्यात नैसर्गिक आपत्तीने मोठे नुकसान झाले आहे. वादळे, महापूर आणि मराठवाडा-विदर्भात झालेला पाऊस याने मोठी हानी झाली. ३८ लाख हेक्‍टर पीक वाया जाणे आणि १८ लाख हेक्‍टर जमीन वाहून जाणे यामुळे मोठी हानी झाली. यातून शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव पॅकेज अपेक्षित होते; परंतु नुकसानभरपाई मिळाली नाही, विमाही मिळाला नाही.

त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना चांगली मदत मिळाली होती. आम्ही पंचनाम्याशिवाय पैसे दिले. कर्जमाफी केली. दुकानदारांना मदत केली. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी हेदेखील २०१९ चा फडणवीस सरकारचा जीआर शासनाने अमलात आणावा अशी मागणी करत आहेत. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे; मात्र निव्वळ आश्वासने दिली जात आहेत. याचा निषेध म्हणून एक तारखेला भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात कार्यकर्ते काळी फीत बांधून निषेध नोंदवणार आहेत. या वर्षीची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे."

ते म्हणाले, "नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत. ज्या-त्या पातळीवर कार्यकर्ते पक्ष तयारी करत आहेत. इस्लामपुरात विक्रम पाटील यांनी त्यांच्या प्रभागातील मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदारांचे चांगले समर्थन मिळवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे त्यांना झुकते माप मिळाल्याने मोठी कामे झाली. गेल्या निवडणुकीतील वचननामा, आश्वासने समोर ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेना कोणती भूमिका घेईल याबाबत अद्याप माहिती नाही. निवडणुकांचे वातावरण निर्माण झाल्यावर स्थानिक पातळीवर असलेली परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. ज्या ठिकाणी विकास आघाडीसारखे प्रयोग करावे लागतात, त्याठिकाणी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली जावी, असा आग्रह करता येणार नाही. निवडणूक पार्श्वभूमीवर सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. संघटनात्मक बांधणी पक्की करण्यावर भर दिला जात आहे." सुशांत पाटील, समीर मुल्ला, रफिक तांबोळी, मुबारक मुलाणी, अशोक पाटील, भूषण पवार, बबन कदम, सनी खराडे, समीर आगा, अष्पाक तहसीलदार, गौरव खेतमल, सुहेल गोलंदाज,आसिफ अत्तार उपस्थित होते.

खासदार संजय पाटील यांनी ईडीच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने जाणीवपूर्वक कोणाला टार्गेट केले नव्हते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते सुखात होते. आम्ही कोणतीही गटबाजी केली नाही शिवाय दोन नंबरचे पैसे ज्यांच्याकडे असतात किंवा मनी लॉंडरिंगसारख्या प्रकारांसाठी ईडीचा संदर्भ येतो. त्याबाबतीत कसलाही संबंध नसल्यामुळे आपला ईडीसी संबंध नाही, असा अर्थ संजय काकांना अपेक्षित असावा."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com