पोलिस आणि शिक्षकाच्या घरावर ठेवली पाळत अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 1 डिसेंबर 2019

पाटील यांना भेटायचे आहे... असे म्हणून रुक्‍मिणी अपार्टमेंटमध्ये चोरटा शिरला. त्या वेळी एका महिलेने इथे कोणी पाटील राहत नाही असे सांगितले. मात्र, पाटील नवीन आले आहेत असे म्हणून चोरटा तिसऱ्या मजल्यावर गेला होता.

सोलापूर : शनिवारी सकाळी साडेनऊ ते बाराची वेळ... जुळे सोलापुरात दोन ठिकाणी घरफोडी... एक घर ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विवेक सांजेकर यांचे तर दुसरे घर शिक्षक असलेल्या शिवप्पा जमादार यांचे. दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पाळत ठेवून घरात कोणीही नसल्याची संधी साधून अडीच तासांत सोन्याचे दागिने, रोकड असा एकूण पाच लाख 35 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 

हेही वाचा : पोलिसांच्या हाताला हिसका देऊन  सांगोल्यात आरोपी पळाला

घर बंद करून नोट्‌स आणायला गेला 
जुळे सोलापुरातील आर्य चाणक्‍य नगर परिसरातील मारुती मंगल कार्यालयाच्या मागे राहणाऱ्या शिक्षक शिवप्पा जेटेप्पा जमादार (वय 50) यांचे घर चोरट्यांनी फोडले. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. जमादार हे गौडगाव (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तर त्यांच्या पत्नी सुनंदा या विंचूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे शिक्षिका आहेत. त्यांची मुलगी श्रुती या वि. मो. मेहता प्रशालेत शिक्षिका आहेत. हे तिघे ड्यूटीवर गेले होते. तर मुलगा अक्षय हा मित्राकडून अभ्यासाच्या नोट्‌स आणण्यासाठी घर बंद करून गेला होता. चोरट्यांनी जमादार यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, सोन्याची साखळी, अंगठी, कर्णफुले, ठुशी, चांदीचे दोन करंडे, चांदीचे पैंजण, कमरेचा छल्ला आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख 94 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर तपास करीत आहेत. 

हेही वाचा : वाढदिवस साजरा करण्याचे यांचे आदर्श उदाहरण

पाऊण तासात घर फोडले 
सहायक फौजदाराचेजुळे सोलापुरातील केएलई शाळेसमोरील रुक्‍मिणी संकुल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सहायक फौजदार विवेक विनायक सांजेकर (वय 50) यांचे घर चोरट्यांनी फोडले आहे. शनिवारी सकाळी सव्वाअकरा ते 12 यावेळेत ही घटना घडली आहे. लग्नकार्य असल्याने सांजेकर यांच्या पत्नी नातेवाइकांकडे गेल्या होत्या. तर सांजेकर हे घर बंद करून लग्नाच्या खरेदीसाठी मुलगा शुभमसह बाजारात गेले होते. खरेदीवरून सांजेकर हे 12 वाजता आले. त्या वेळी अपार्टमेंटमधून दोघे चोरटे पळून गेले. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतील लोखंडी कपाटातील सोन्याचे गंठण, अंगठी, मंगळसूत्र, सोन्याचे लॉकेट, कर्णफुले, चांदीचे आणि सोन्याची नाणी, पॅन कार्ड, एक लाख 30 हजार रुपयांची रोकड, धनादेश, आधार कार्ड, बचत गटाचे पासबुक, बॅंकेचे पासबुक असा एकूण दोन लाख 40 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सहायक फौजदार एस. एम. मोरे तपास करीत आहेत. 

हेही वाचा : प्रेयसीचा गळा दाबून खुनाचा  प्रियकराने केला प्रयत्न 

सहायक फौजदाराला चाकूचा धाक... 
पाटील यांना भेटायचे आहे... असे म्हणून रुक्‍मिणी अपार्टमेंटमध्ये चोरटा शिरला. त्या वेळी एका महिलेने इथे कोणी पाटील राहत नाही असे सांगितले. मात्र, पाटील नवीन आले आहेत असे म्हणून चोरटा तिसऱ्या मजल्यावर गेला होता. बाजारातून आल्यानंतर सहायक फौजदार विवेक सांजेकर हे अपार्टमेंटच्या खाली गेटपाशी थांबले होते. मुलगा शुभम साहित्य ठेवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरील घरात निघाला होता. पायरीपाशी एक तरुण थांबला होता. तर त्याचा साथीदार पायरीवरून खाली येत असल्याचा दिसला. घराचा दरवाजा उघडा दिसला. खाली येणाऱ्या तरुणाला शुभमने हटकले. त्याला मोबाईल फेकून मारण्याचा प्रयत्न केला. शुभमने पप्पा लवकर या... असा आवाज दिला. खाली थांबलेल्या सांजेकर यांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चोरट्याने सांजेकर यांना चाकूचा धाक दाखवला. चोरट्यांच्या हातात कटावणी आणि सांजेकर यांच्या घराचे तोडलेले कुलूप होते. शुभमला काही झाले का हे पाहण्यासाठी सांजेकर हे तिसऱ्या मजल्यावर गेले. त्यावेळी चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft in Jule Solapur