साथीदाराने चोरी केलेल्या दुचाकी विकणाऱ्याला पोलिसांनी केले जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

पथकाने त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. पण त्याने उडावाउडवीचे उत्तरे दिली.

सांगली : साथीदाराने चोरी केलेल्या दुचाकी विक्री करताना खरसुंडी (ता. आटपाडी) येथील एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून सव्वाचार लाखांच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या. प्रशांत शिवाजी कदम (वय ३३) असे संशयिताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अच्युत सुर्यवंशी हे कुपवाड एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. या वेळी एक तरुण दुचाकी विक्रीसाठी तानंग फाटा येथे येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पथकाने तानंग फाटा येथे सापळा रचला. तेथील बसथांब्याच्या बाजूला एक विना नंबरप्लेटची दुचाकी घेऊन प्रशांत कदम थांबला होता.

हेही वाचा - ब्रेकिंग - पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर सापडले तोफगोळे

पथकाने त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. पण त्याने उडावाउडवीचे उत्तरे दिली. सहायक निरीक्षक कुलदीप कदम यांनी दुचाकीचे चेस व इंजिन नंबरवरून मुळ मालकाचा पत्ता शोधला असता ही मोटारसायकल लक्ष्मी मंदिरापासून चोरल्याचे स्पष्ट झाले. प्रशांत कदम याची पथकाने कसून चौकशी केली. कदम याने त्याचे साथीदार अमित दीपक मोहिते (वय १९), लक्ष्मण शहाजी चव्हाण (२२) व विजय सुखदेव निळे (२२, सर्व रा. करगणी) यांनी ठिकठिकाणी मोटारसायकली चोरल्या होत्या.

त्यांनी त्या आपल्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. सध्या त्याचे तिघेही साथीदार अटकेत असून त्यांच्याकडून १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. कदम याने खरसुंडीतील घराजवळ आणखी सात मोटारसायकली असल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने त्याच्या घरावर छापा टाकून सात मोटारसायकली ताब्यात घेतल्या. त्याची किंमत चार लाख २५ हजार इतकी आहे. त्याला पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चार जिल्ह्यांत चोऱ्या 

टोळीने सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यांत मोटारसायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कदम याच्याकडे आठ मोटारसायकली सापडल्या. त्या संजयनगर, सांगोला, कऱ्हाड, शाहूपुरी कोल्हापूर, आटपाडी, विटा, म्हैसाळ येथून चोरल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा -  सांगलीची पोरं हुश्शारच! विद्यार्थ्यांनी बनवलेल्या लघुउपग्रहातून मिळणार ही महत्वाची माहिती -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft of two wheelers in sangli found one person by police in sangli