मॉन्सून लांबला तरी चिंता करण्याची गरज नाही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्त्रोत असलेल्या राकसकोप व हिडकल जलाशयात यंदा मुबलक पाणीसाठा आहे. राकसकोपमध्ये गतवर्षीच्या तुलनेत चार फूट जास्त पाणी आहे. हिडकल जलाशयातही गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 14 टीएमसी जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे, दरवर्षी फेब्रुवारीपासूनच पाण्याचे नियोजन करण्यासाठी धडपडणाऱ्या पाणीपुरवठा मंडळालाही दिलासा मिळाला आहे. 

बेळगाव - बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्त्रोत असलेल्या राकसकोप व हिडकल जलाशयात यंदा मुबलक पाणीसाठा आहे. राकसकोपमध्ये गतवर्षीच्या तुलनेत चार फूट जास्त पाणी आहे. हिडकल जलाशयातही गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 14 टीएमसी जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे, दरवर्षी फेब्रुवारीपासूनच पाण्याचे नियोजन करण्यासाठी धडपडणाऱ्या पाणीपुरवठा मंडळालाही दिलासा मिळाला आहे. 

हे पण वाचा - आठ हजार कामगारांना मिळाले काम

गतवर्षी बेळगाव शहर व परिसरात तसेच दोन्ही जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. पाऊस नोव्हेंबरपर्यंत लागल्याने दोन्ही जलाशयांतील पाण्याची घटलेली पातळी पुन्हा वाढली. त्यामुळेच या दोन्ही जलाशयांबाबत यंदा समाधानकारक स्थिती आहे. राकसकोपची पाणी साठवण क्षमता केवळ अर्धा टीएमसी असली तरी ते जलाशय शहरासाठी खूप महत्त्वाचे आहे. या जलाशयातून सायफन पद्धतीने पाणी हिंडलग्यातील उपसा केंद्रात आणले जाते. तेथून ते पाणी लक्ष्मीटेकडीतील शुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते. त्यामुळे, राकसकोप जलाशयाच्या पाणीपुरवठ्याचा खर्च हिडकलपेक्षा कमी आहे. हिडकल जलाशयाची क्षमता जास्त आहे. पण, तब्बल 54 किलोमीटर अंतरावरुन पाणी बेळगावात आणले जाते. शिवाय दोन ठिकाणी या पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे, राकसकोप जलाशयातील पाणी मे अखेरपर्यंत टिकून राहावे यासाठी मंडळाचा प्रयत्न असतो. 

हे पण वाचा - Valentine Day Special - मेरा दिल खोले तो, तेरा दिल नजर आयेगा....

2018 मध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे, 2019 मध्ये उन्हाळ्यात बेळगावकरांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागली होती. पण, यंदा गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत चांगली स्थिती आहे. राकसकोप जलाशयात गतवर्षीपेक्षा चार फूट जास्त पाणी आहे. त्यामुळे, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राकसकोपमधील पाणी पुरेल असे मंडळाला वाटते. मॉन्सून लांबला तरी यंदा मंडळ व बेळगावकरांना चिंता करण्याचे कारण नाही. हिडकल जलाशयात यंदा 14 टीएमसी पाणीसाठा जास्त असला तरी एप्रिल व मे महिन्यात पाणी शेतीसाठी सोडले जाते. गतवर्षी तर हिडकलमधील पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे, जलाशयाची पातळी खालावली होती. या जलाशयात बेळगाव शहरासाठी एक टीएमसी पाणी राखीव ठेवले जाते. पण, राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपला किंवा तेथील मृतसाठ्यातील उपसा सुरु झाला की मंडळाला हिडकल जलाशयावरच अवलंबून राहावे लागते. 

तुलनात्मक पाणीसाठा 
तारीख*राकसकोप (फुटात)*हिडकल (टीएमसी) 
14 फेब्रुवारी 2019*2,466.70*18.87 
14 फेब्रुवारी 2020*2,471.00*32.89 

राकसकोप व हिडकल या दोन्ही जलाशयांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे, यंदा शहरात पाणीटंचाईची स्थिती उद्भवणार नाही. तरीही पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे. 
- मल्लिकार्जुन राचनायकर, साहाय्यक कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा मंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is abundant water resources this year in Raksakop and Hidakal reservoirs