सांगलीत होता अजितदादांचा मोठा गट 

अजित झळके
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

सांगलीतून पक्षाच्या बहुतेक नेत्यांनी अजितदादांवर नाराजीचा, संतापाचा उघड सूर आळवला आहे, मात्र एककाळ असा होता की अजितदादांचा सांगलीत एक मोठा गट होता. जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांच्या कुरघोड्यांच्या राजकारणाला वैतागून त्यांनी वेगळी मोट बांधली होती. विशेष म्हणजे आता त्यातील बहुतेक सर्व मंडळी भाजपमध्ये आहेत. 

सांगली - राज्याच्या राजकारणाला धक्कादायक कलाटणी देत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कोण - कोण आमदार बंड करणार, पक्ष कसा फोडणार यावर चर्चा सुरु आहे. सांगलीतील तीनही आमदारांनी याघडीला आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. सांगलीतून पक्षाच्या बहुतेक नेत्यांनी अजितदादांवर नाराजीचा, संतापाचा उघड सूर आळवला आहे, मात्र एककाळ असा होता की अजितदादांचा सांगलीत एक मोठा गट होता. जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांच्या कुरघोड्यांच्या राजकारणाला वैतागून त्यांनी वेगळी मोट बांधली होती. विशेष म्हणजे आता त्यातील बहुतेक सर्व मंडळी भाजपमध्ये आहेत. 

राज्यात राष्ट्रवादीचा सुवर्णकाळ असताना जिल्ह्यात पक्षाने मुसंडी मारली होती. जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, बाजार समिती, साखर कारखाने, ग्रामपंचायती यावर या पक्षाचीच सत्ता होती. कॉंग्रेसमधल्या अनेक नेत्यांना फोडून राष्ट्रवादी बळकट झाली होती. शिराळ्यापासून जतपर्यंत ही स्थिती होती. प्रारंभी जिल्ह्याचे नेतृत्व दिवंगत मदन पाटील यांच्याकडे होते. राज्याचे राजकारण आबा आणि जयंतराव पहात होते. कालांतराने मदनभाऊंनी राष्ट्रवादी सोडली आणि आबा-जयंतरावांचा काळ सुरु झाला. या दोन नेत्यांतही फारसे सख्य नव्हते. त्यामुळे जयंतरावांचे विरोधक आबांकडे तर आबांचे विरोधक जयंतरावांकडे अशी विभागणी होती.

अजितदादांच्या गटात होते हे नेते

2009 च्या निवडणुकीनंतर मात्र चित्र वेगळे झाले. अनेक नेत्यांनी आबा आणि जयंतरावांपेक्षा अजितदादा भारी, असा नारा देत इस्लामपूर, तासगावला बगल देत बारामतीचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यात सध्याचे खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा समावेश होता. ही मंडळी आपली कामे, अडचणी घेऊन अजितदादांकडे जायची. इथल्या कुरबुरींच्या तक्रारीही तेथेच करायची. 

हेही वाचा - सांगलीचे माजी महापाैर म्हणाले, अजित पवारांची स्वार्थासाठी गद्दारी

अजितदादा गटाचा उघडपणे संजयकाकांना पाठींबा

या सर्व मंडळींनी सन 2014 च्या निवडणुका तोंडावर येणार हे लक्षात घेत 2012 च्या सुमारास राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा फडकावला. आपला स्वतंत्र दुष्काळी फोरम स्थापन केला. आम्ही राष्ट्रवादीतच आहोत, मात्र दुष्काळ हटावा यासाठी आम्ही स्वतंत्रपणे फोरमच्या माध्यमातून काम करू, असे जाहीर केले होते. राष्ट्रवादीतील या कुरबुरींची उघड चर्चा होत राहिली. पुढे 2014 च्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला आणि त्यावेळच्या अजितदादा गटाने उघडपणे राष्ट्रवादीत राहून संजयकाकांचे भाजपचे काम केले होते. अजितदादांसारखीच बंडखोरीची तयारी असणाऱ्या नेत्यांची ही भूमिका संजयकाकांच्या विजयाला कारणीभूत ठरली. पुढे ही मंडळी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये गेली. पैकी घोरपडे आता शिवसेनेत आहेत, बाकी सर्व भाजपमध्ये आहेत. 

हेही वाचा - राष्ट्रवादीचे शिराळ्याचे आमदार म्हणाले मी यांच्यासोबत 

अन्‌ जगतापांचा पराभव 

विलासराव जगताप हे अजितदादा गटाचे म्हणूनच ओळखले जायचे. आबांचा तर त्यांना उघड विरोध असायचा. जयंतराव जगतापांना सांभाळायचे, मात्र अंतर ठेवून. दादांचा मात्र वरदहस्त होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विलासराव जगताप यांना राष्ट्रवादीची जतची उमेदवारी दिली. विरोधकांकडे त्यावेळी उमेदवारच नव्हता. ऐनवेळी भाजपने प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी दिली, कॉंग्रेस बरखास्त करून शेंडगे यांच्या मागे उभी राहिली आणि जगताप यांचा पराभव झाला. जगतापांनी यामागे जयंतराव, आबांचा अप्रत्यक्ष हात असल्याचा उघड आरोप केला होता. अजितदादा गटाचा असल्यानेच हे घडले, असे ते सांगायचे. 

हेही वाचा - 

मी पुन्हा आलो; पण एवढ्या सकाळी सकाळी... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Was Large Group Of Ajit Pawar In Sangli