अतिवृष्टीचे बाराशे कोटी गेले कुठे...नक्‍की वाचा 

fund
fund

सोलापूर : अतिवृष्टीने बाधित झालेल्या राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सहा हजार पाचशे कोटी वितरीत केले. मदतीची सर्व रक्‍कम संबंधित शेतकऱ्यांना वितरीत केल्याचा तहसिलदारांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला पाठविण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, सुमारे 13 लाख 70 हजार शेतकऱ्यांचे एक हजार 214 कोटींची रक्‍कम तहसिलदारांच्याच खात्यावर शिल्लक असल्याचा खुलासा सोलापुरातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. 


दुष्काळातून सावरतानाच राज्यातील महापूर व अतिवृष्टीमुळे बळीराजाचा संसार उघड्यावर आला. राज्य सरकारने तातडीने केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला, केंद्र सरकारच्या पथकांकडून नुकसानीची पाहणीही झाली. तत्पूर्वी, नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने स्वत:च्या आपत्कालीन निधीतून साडेसहा हजार कोटी रुपये वितरीत केले. बीडीएसद्वारे मदतीची रक्‍कम सर्व जिल्ह्यांच्या ट्रेझरीत जमा केली. सरकारच्या निर्देशानुसार मदत वितरीत करण्यासाठी तहसिलदारांनी रक्‍कम स्वत:च्या शासकीय खात्यात वर्ग केली. तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांची माहिती घेवून रक्‍कम संबंधित शेतकऱ्यांना वाटपही केले. परंतु, ज्या शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकीचे आहेत, ज्यांनी खाते क्रमांक दिलेच नाहीत अथवा अचूक खाते क्रमांक दिलेल्या शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून तलाठी कार्यालयाचे उंबरठेच झिजवावे लागत आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर यासह अन्य तालुक्‍यांचा समावेश आहे. दुसरीकडे मात्र, मदतीची रक्‍कम 100 टक्‍के वितरीत केल्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला. आता मंत्रिमंडळ विस्तार, विधानसभा निवडणुकीसह अन्य कारणे काही अधिकारी पुढे करीत आहेत. 


शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी 
अतिवृष्टीने बाधित झालेल्या राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांसाठी सहा 500 कोटींची मदत वितरीत करण्यात आली आहे. आतापर्यंत 90 टक्‍क्‍यांहून रक्‍कम वितरीत केल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अचूक माहिती देऊनही मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी. रक्‍कम शिल्लक असतानाही 100 टक्‍के वितरीत झाल्याचा अहवाल देणाऱ्या तहसिलदारांवर कारवाई केली जाईल. 
- किशोरराजे निंबाळकर, सचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई 


राज्याची स्थिती 
अतिवृष्टीची मदत 
6,500 कोटी 
नुकसानग्रस्त शेतकरी 
1.03 कोटी 
वितरित न झालेली रक्‍कम 
1,214 कोटी 
मदतीच्या प्रतीक्षेतील शेतकरी 
13.70 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com