Tring ... tring ... cycling; Increased turnover in "Lockdown"
Tring ... tring ... cycling; Increased turnover in "Lockdown"

ट्रिंग...ट्रिंग... सायकलिंग;  "लॉकडाउन'मध्ये वाढली उलाढाल 

सांगली : सायकल ते दुचाकी, चारचाकी ते पुन्हा सायकल, असे चक्र सध्या पाहायला मिळू लागलेय. व्यायामाच्या ओढीने अनेकांनी सायकलचे पॅडल पुन्हा मारण्यास सुरवात केलीय. शहरांसह ग्रामीण भागात सायकलिंगचे ग्रुप बनत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या "लॉकडाउन' काळात मोठ्या प्रमाणात सायकलींची विक्री झाली.

लॉकडाउनमुळे घरी बसून निर्माण होणारी स्थूलता टाळण्यासाठी अनेकांनी महागड्या सायकली विकत घेतल्यात. लॉकडाउनमध्ये सांगलीतील मोकळे रस्ते म्हणजे सायकल ट्रॅकच बनल्याचे चित्र होते. येथे सायकलच्या घंटीची "ट्रिंग..ट्रिंग' ऐकू येत आहे. 

शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांच्या आवारात 20 ते 25 वर्षांपूर्वी सायकली लावण्यासाठी स्टॅन्ड दिसायचे. गेल्या काही वर्षांत ठराविक अपवाद वगळता महाविद्यालयातील सायकल स्टॅन्डची जागा दुचाकींनी घेतली आहे. पूर्वी दहावी-बारावी उत्तीर्ण झाले, की बक्षीस म्हणून नवी कोरी सायकल मिळायची. आता थेट दुचाकी हवी असते. त्यामुळे 20 वर्षांत सायकलींची संख्या कमी होऊन दुचाकी वाढल्या. त्याचबरोबर चारचाकींची संख्याही. आता पुन्हा व्यायामासाठी म्हणून सायकल घेणाऱ्यांची संख्या चार-पाच वर्षांत वाढत चालली आहे. सायकल ते दुचाकी, चारचाकी आणि पुन्हा सायकल, असे चक्र पूर्ण झाले. 

"जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातील सायकल रेसचा थरार आजही अनेकांना हवाहवासा वाटतो. हा चित्रपट कोणत्याही चॅनेलवर लागला, की अनेक जण तो आवर्जून पाहतात. या चित्रपटापासून गिअरच्या सायकलींची क्रेझ निर्माण झाली. साध्या सायकलऐवजी रेंजर, रेसर सायकलींचे प्रमाणही वाढले. सध्या जिममध्ये जाऊन सायकलिंग करण्यापेक्षा मोकळ्या हवेत सायकल चालवून पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबतही अनेकांत जागृती झाली आहे. सकाळी व्यायामासाठी म्हणून सायकल काढून बाहेर पडणाऱ्यांचे ग्रुप विविध भागात तयार झालेत. ग्रामीण भागातही हे लोण पोहोचलेय. प्रत्येक आठवड्याला दूरवर सायकल ट्रिप काढून आनंद घेतला जातोय. 

रोज किमान 20 किलोमीटर सायकलिंग आवश्‍यक

व्यायामासाठी सायकलिंग करत असाल तर गिअरची सायकल उपयोगी नाही. तिच्यामध्ये चढ-उतार मॅनेज करता येत असल्यामुळे व्यायाम होत नाही. वजनदार व साधी सायकल आवश्‍यक आहे. टेकडी चढतानाचा फिल गिअर बदलून येणार नाही. गिअरची सायकल ही शर्यतीसाठी उपयोगी ठरते. व्यायामासाठी रोज किमान 20 किलोमीटर सायकलिंग आवश्‍यक आहे. व्यायामाव्यतिरिक्त दैनंदिन कामासाठी किंवा नोकरीच्या ठिकाणी सायकलने जाणे कमीपणाचे मानले जाऊ नये. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग वाढले, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. 
- इनायत तेरदाळकर, शरीरसौष्ठव प्रशिक्षक 

सायकलिंगचे फायदे 
सायकलिंगमुळे पर्यावरणाचे रक्षण तर होतेच; शिवाय शरीर तंदुरुस्त राहते. रक्ताभिसरण वाढते. शरीरातील अनावश्‍यक चरबी कमी होण्यास मदत होते. स्नायू बळकट होतात. नियमित सायकलिंगमुळे औषधाविना झोप लागते, असा अनेकांचा अनुभव आहे. वजनदेखील नियंत्रणात राहते. मोकळ्या हवेतील सायकलिंगमुळे शुद्ध हवा आणि ऑक्‍सिजनदेखील मिळतो. 

सांगलीत लाखाच्या सायकली 
सायकलिंगमध्ये प्रथमच शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला जिल्ह्यातील हुसेन कोरबू याच्याकडे साडेतीन लाखांची सायकल आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून ती मिळाली. आयर्नमॅन स्वप्नील कुंभारकर यांच्याकडेही अडीच लाखांची सायकल आहे. याशिवायही सांगलीतील मोठे उद्योजक, कारखानदार, डॉक्‍टरांकडे लाखो रुपये किमतीच्या सायकली आहेत. 

1949 ला सायकलची किंमत 18 रुपये 
सायकल ही एके काळी समृद्धी मानली जात होती. ज्याच्या घरी सायकल तो खरा श्रीमंत मानला जायचा. सांगलीत दिलजीतसिंग चढ्ढा यांनी 1949 मध्ये पहिले सायकल दुकान सुरू केले. त्यावेळी त्यांनी पहिली सायकल 18 रुपयांना विकली. 22 इंची आणि 24 इंची मजबूत सायकली मिळायच्या. नंतर 1960 च्या दशकात सायकलने 100 रुपयांचा टप्पा पार केला. त्यावेळी 120 रुपयांना मी पहिली सायकल विकली, असे श्री. चढ्ढा यांनी सांगितले. सन 1990 च्या दशकात सायकलच्या दराने 500 रुपयांचा टप्पा पार केला. सत्पालसिंग सांगतात, "मी व्यवसायात आलो आणि पहिली सायकल विकली ती 500 रुपयांना. आता किंमती 4 हजार रुपयांपासून काही लाख अशा आहेत.' 

नगरपालिका द्यायची बिल्ला 
सांगलीत सायकल विकायला सुरवात झाली, त्यावेळी ती खरेदी करण्यासाठी मान्यता घ्यायला लागत होती. नगरपालिकेकडून एक बिल्ला दिला जायचा. तो घेऊनच सायकल खरेदीला जावे लागायचे. तो बिल्ला सायकलला बसवला जायचा. तोच सायकलचा नोंदणी क्रमांक मानला जायचा. काही काळ सायकल चालवण्यासाठी परवाना दिला जात होता. 

सायकल दुकानासाठी कर्ज 
सायकल हे श्रीमंतीचे लक्षण होतेच; शिवाय सायकल दुरुस्ती, पंक्‍चर काढणे हा सन्मानाचा व्यवसाय मानला जात असे. गुंतवणूक छोटी; मात्र काही बॅंकांनी कर्ज योजना सुरू केली होती. सांगली डीसीसीने सायकल दुकानासाठी कर्ज दिल्याची त्यांच्या अहवालात नोंद आहे. 

तर व्हायची कारवाई 
25 ते 30 वर्षांपूर्वी सायकलींची संख्या जास्त होती. सायकलला मागे कॅरिअर असे. पती-पत्नी आणि मुले असे कुटुंबदेखील सायकलवरून प्रवास करीत. शहरात सायकलवर डबलसीट दिसले तर पोलिस हटकत. दंडाची कारवाई करत. तसेच समज म्हणून पुंगळी काढून घेऊन सोडून देत. डायनॅमा नसेल किंवा घंटी नसेल तरीही कारवाई होई. 

सायकल भाड्याने मिळेल 
शहरात जागोजागी "सायकल भाड्याने मिळेल' असे फलक 20 वर्षांपूर्वी जागोजागी असत. अजूनही आहेत; पण तुरळक ठिकाणी. भाडे तासावर आकारले जाई. ओळखपत्र ठेवून सायकल मिळे. सायकलींची संख्या वाढल्यानंतर भाड्याने देण्याचे प्रमाण कमी होत गेले. 

दोघे "शिवछत्रपती'चे मानकरी 
सायकलिंगमध्ये हुसेन कोरबू याने सांगली जिल्ह्याला सर्वप्रथम शिवछत्रपती पुरस्कार मिळवून दिला. या पुरस्कारामुळे त्याला महापालिकेत नोकरी मिळाली. तीन वर्षांपूर्वी शाहीद अहमद जमादारला दुसरा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. 

सायकलचे प्रकार 

  • एमटीबी (माऊंटन बाईक) - खराब व उंचसखल रस्ते, डोंगरवाटामधून चालणारी सायकल. 
  • हायब्रीड बाईक - खराब व गुळगुळीत डांबरी अशा दोन्ही ठिकाणी सायकल वापरता येते. 
  • रोड बाईक - मुख्यत्वेकरून रोड रेस व चांगल्या रस्त्यावर चालते. भारतात तसेच तैवान आणि युरोपमध्ये सायकली मिश्रधातूमध्ये बनवल्या जातात. 


सायकल दुरुस्ती व्यवसायाचे अर्धशतक 
सराफ कट्ट्यातून उत्तरेला मगरमच्छ कॉलनीकडे जाताना झॉंशी चौकात कोपऱ्यावर एक सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. रामभाऊ कुकळ्येकर ते चालवतात. त्यांच्या व्यवसायाला अर्धशतक झाले. तीन पिढ्यांतील सायकलिंग त्यांनी पाहिले. ते म्हणतात, ""पन्नास वर्षांपूर्वी 90 रुपयांत मिळणाऱ्या सायकलमध्ये आज शेकडो प्रकार आले आहेत. भाड्याने सायकल घेऊन जाणारा वर्ग नाहीसा झाला. प्रवासाची सोय असलेली सायकल आज कॅलरीज जाळण्यासाठी वापरतात. 4 हजारांपासून 10 लाखांपर्यंतच्या सायकली वापरणारा वर्ग आहे. ट्यूबलेस, कमी वजनाच्या, गिअर, विनागिअर, मजबूत शॉक ऍब्सार्बर असणाऱ्या सायकलींना लोक पसंत करीत आहेत. आजही सायकलच्या चाकाभोवतीच रोजचा दिवस कसा जातो कळत नाही. अडचणीत कुटुंब चालवण्याचे बळ सायकलनेच दिले.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com