
विजापूरहून या भागात पशुखाद्याचा पुरवठा करणारा ट्रक हंचिनाळहून कोगनोळीकडे येत होता. येथील कोळी मळ्याजवळच असणाऱ्या शेट्टी यांच्या विहीरीजवळ आला
कोगनोळी (बेळगाव) : हंचिनाळ-कोगनोळी रस्त्यावर ट्रक विहिरीत पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 19) सकाळी अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यात चार जण बचावले असून जीवित हानी टळली. मात्र पशुखाद्याचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,
विजापूरहून या भागात पशुखाद्याचा पुरवठा करणारा ट्रक हंचिनाळहून कोगनोळीकडे येत होता. येथील कोळी मळ्याजवळच असणाऱ्या शेट्टी यांच्या विहीरीजवळ आला असता चालकाचा ताबा सुटून ट्रक रमेश शेट्टे यांच्या विहिरीत जाऊन पलटी झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण पशुखाद्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले. अपघातस्थळी पशुखाद्याची पोती विस्कटून पडली होती. तसेच माहिती मिळताच लोकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा- श्वेता आणि बाळाच्या मृत्यूने नातेवाईकांसह ग्रामस्थांचा आक्रोश; न्यायासाठी गाव गोळा
ट्रकमध्ये होते चौघे
ट्रकमध्ये चालक व तीन मजूर होते. सुदैवाने ट्रक विहिरीच्या कडेला पलटी झाल्याने ट्रकमध्ये पुढे बसलेले तिघे जण उलट्या बाजूने बाहेर आले. तर एकजण पशुखाद्याच्या पोत्यावर बसला होता. तो विहिरीत जाऊन पडला. त्याला पोहता येत असल्याने पोहून विहीरीबाहेर आला.
संपादन - अर्चना बनगे