esakal | उदयनराजेंना 'तो' शब्द खरा करण्याची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंना 'तो' शब्द खरा करण्याची संधी

"आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना राजघराण्याला या वादात ओढले. त्यातून उदयनराजेंनी पुन्हा एकदा राऊतांसह शिवसेनेवर तोफ डागली. तद्‌नंतर राऊतांनी "थेट वंशज असल्याचे पुरावा दाखवा,' असे सांगून या आगीत तेलच ओतले. त्यामुळे त्याचा भडका होऊन उदयनराजे समर्थक महाराष्ट्रातील विविध भागांत आंदाेलन करीत आहेत. 

उदयनराजेंना 'तो' शब्द खरा करण्याची संधी

sakal_logo
By
विशाल पाटील

सातारा : "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून पेटलेला वाद राजघराण्याभोवती फिरू लागला आहे. त्यामुळे 2009 मध्ये पेटलेल्या राजकीय वादाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी खासदार संजय राऊत विरोधात माजी खासदार उदयनराजे भोसले असा खडा वाद उभा ठाकला आहे. "शिवसेनेची ठाकरेसेना करा,' असा सल्ला त्या वेळी उदयनराजेंनी दिला होता, तर "नावापुढचे राजे काढा,' असा हल्ला ठाकरेंनी चढविला होता.
 
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 2009 मध्ये उदयनराजे भोसले यांनी येथील तालीम संघाच्या मैदानावरील मेळाव्यात, "शिवसेनेने आतापर्यंत छत्रपतींचे नाव पुढे करून राजकारण केले. छत्रपतींच्या नावाने मतांचा जोगवा मागण्याचे शिवसेनेने थांबवावे. हे जमत नसेल तर शिवसेनेऐवजी "ठाकरेसेना' हे नाव द्यावे. मग बघा किती जण पक्षात राहतील. निम्मे ठाकरे कुटुंबच पक्षात असेल,' अशी टीका केली होती.

हेही वाचा -  काळजी करू नका, फार दिवस नाही : उदयनराजे
 
दुसऱ्याच दिवशीच त्या मैदानावर टीकेचा समाचार घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते, की छत्रपती घराण्यात जन्म मिळाला, हे त्यांचे नशीब आहे; परंतु जन्माने माणूस मोठा होत नसतो, तर कर्तृत्वाने मोठा होतो. त्यांचे नाव असले तरी कर्तृत्व नाही. ठाकरेसेना काढा म्हणणाऱ्यांनी हाच निकष लावायचा असेल, तर तुम्ही नावापुढील राजे काढा, तुम्हाला कोण विचारतेय का बघा, अशी घणाघाती टीका केली होती.
 
त्यावर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. ते म्हणाले होते, की छत्रपतींचे नाव घेऊन स्वत:चा फायदा करून घ्यायचा, हाच त्यांचा उद्योग आहे. कोणताही उद्योग नसताना एवढी संपत्ती कशी कमवली? उद्धव ठाकरे यांच्या संकुचित बुद्धीची किव करावीशी वाटते. टीका आणि मत यामधील फरक त्यांना समजला नाही. त्यांना पक्षाचे कार्याध्यक्ष कसे केले? की ठाकरे यांचा मुलगा म्हणून केले गेले, असा प्रश्‍न आहे. अशी संघटना फार काळ टिकणार नाही.'

नक्की वाचा -  उन्माद म्हणजे उदयनराजे; शिवसेनेचे चिमटे

त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातील सभेत "शिवाजी महाराजांच्या विचाराविरोधात शिवसेनेचे काम सुरू आहे. शिवसेना हे नाव बदलून "बकरीसेना' अथवा "ठाकरेसेना' करा,' असा उपरोधिक सल्लाही उदयनराजेंनी दिला होता.
 
"आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना राजघराण्याला या वादात ओढले. त्यातून उदयनराजेंनी पुन्हा एकदा राऊतांसह शिवसेनेवर तोफ डागली. तद्‌नंतर राऊतांनी "थेट वंशज असल्याचे पुरावा दाखवा,' असे सांगून या आगीत तेलच ओतले. त्यामुळे त्याचा भडका होऊन उदयनराजे समर्थकांनी सातारा शहर बंद ठेवले, तसेच राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. 


उदयनराजेंना 'तो' शब्द खरा करण्याची संधी 

"विधानसभेच्या निवडणुका लांब नाहीत. शिवसेनेविरुद्धचे मुद्दे घेऊन मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. कोकणात नारायण राणे, मुंबईत राज ठाकरे यांच्यासारख्या मित्रांचे मला बोलावणे आहेच,' असा इशारा उदयनराजेंनी दहा वर्षांपूर्वी दिला होता. आता त्या मुद्‌द्‌यावरून पुन्हा रान पेटविण्याची संधी उदयनराजेंसमोर आहे. 

हेही वाचा - साताऱ्यात पवारच जनतेचे राजे!