esakal | सातारा : साताऱ्यात पवारच जनतेचे राजे! Election Result 2019
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar-NCP

खरेतर उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील हे दोघे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असले, तरी ही पोटनिवडणूक लढली गेली ती 'पवार विरुद्ध मोदी' अशीच.

सातारा : साताऱ्यात पवारच जनतेचे राजे! Election Result 2019

sakal_logo
By
राजेश सोळस्कर

लोकसभा निवडणुकीत विजयी होऊनही अवघ्या पाचच महिन्यांत पुन्हा निवडणुकीला सामोरे जात अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या उदयनराजे भोसले यांना अखेर परभव पाहावा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा सुसाट वारू काबू करण्यात यश मिळविलेले. राष्ट्रवादी हा बालेकिल्ला कोणत्याही स्थितीत पाडायचा हा भाजपचा मनसुबाच ढासळला असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. साताऱ्यात पवारच जनतेचे राजे आहेत, हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा दावा या निकालाने अधोरेखित केला आहे. 

खरेतर उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील हे दोघे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असले, तरी ही पोटनिवडणूक लढली गेली ती 'पवार विरुद्ध मोदी' अशीच. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा पगडा पूर्वीपासून सातारा जिल्ह्यावर आहे. तोच यशवंत विचार त्यांच्यानंतर शरद पवार यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

- पावसातील एका सभेने बदलले राज्याचे राजकारण

कॉंग्रेसमधून बाहेर पडून 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतरही झालेल्या सर्व निवडणुकांत इथल्या जनतेने पवारांना मोठे यश दिले होते. अलीकडच्या काही वर्षांत मात्र देशात 'मोदीपर्वा'चा उदय झाला आणि भाजपने 2014 मध्ये केंद्रातील आणि त्यापाठोपाठ राज्यातील सत्ताही हस्तगत केली. पवारांना मानणाऱ्या साताऱ्यात मात्र 2014 मध्येही ना भाजपची डाळ शिजली, ना मोदींची जादू चालली. पाटण वगळता विधानसभेच्या सर्व जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच मिळाल्या.

पाटणमध्ये शिसेनेच्या तिकीटावर शंभूराज देसाई विजयी झाले होते. मात्र तो युतीच्या प्रभावाचा नव्हे, तर देसाईंच्या व्यक्तिगत ताकदीचा विजय होता. 2014 च्या निवडणुकीतील या परिस्थितीनंतर मात्र भाजपने सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले. काहीही करून पवारांची या जिल्ह्यावरील पकड कमी करायचीच, असा चंग बांधलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यापाठोपाठ उदयनराजे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्‍का दिला. 

- देवेंद्रजी, हा इथे आहे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष !

मात्र, यथावकाश या धक्‍क्‍यातून सावरत पवार हे विधानसभेसोबतच या पोटनिवडणुकीच्या तयारीला लागले. उदयनराजे यांच्या विरोधात पवार यांनी माजी सनदी अधिकारी आणि सिक्‍कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. सातारा जिल्ह्यात चांगली प्रतिमा असलेल्या पाटील यांनीही उदयनराजेंना 'काँटे की टक्‍कर' देत विजय साकारला. 

उदयनराजेंचा पराभव होण्यामागे जी काही कारणे सांगितली जातील, त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी घेतलेली दुटप्पी भूमिका. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्या आमदरांच्या ताकदीवर ते विजयी झाले. त्याच आमदारांच्या विरोधात ते या पोटनिवडणुकीत विरोधात उभे राहिले. एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीत मी म्हणजे मकरंद पाटील, मी म्हणजे बाळासाहेब पाटील अशी आमदारांची नावे घेत आवाहन करणारे उदयनराजे पाच महिन्यांत त्यांच्यावर टीका कशी करू शकतात, असा सवाल सुज्ञ जनतेला पडला. त्यांची ही भूमिका जनतेला रुचली नाही. 

- करमाळा : डाळिंबाच्या करमाळ्यात सफरचंदाची हवा; संजयमामा विजयी!

खरे तर भाजपनेही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करत उदयनराजेंना मोठे पाठबळ दिले. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभाही घेण्यात आली. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी भरपावसात झालेल्या पवारांच्या सभेने फार मोठा चमत्कार घडवला. मुळात सारे काही आलबेल असताना ऐनवेळी उदयनराजे सोडून गेल्याने पवारांबाबत या जिल्ह्यात सुप्त सहानुभूती होतीच. या पावसातील सभेने त्यात आणखी भर घातली आणि या सभेमुळे मोदींची सभा पुसून टाकली गेली. 

'उदयनराजेंना याआधी तिकीट देऊन मी चूक केली. ही चूक जनतेने दुरुस्त करावी,' अशी भावनिक साद पवार यांनी आपल्या सभेत घातली होती. पवार यांची ही साद हा त्या सभेतील परमोच्च क्षण होता. मात्र, उदयनराजेंनी दुसऱ्या दिवशी कऱ्हाडमध्ये पवारांच्या या सभेची खिल्ली उडविण्याच्या नादात त्यांच्यावर जहरी टीका केली. 'पवारांची पावसातली सभा म्हणजे काळू-बाळूचा तमाशा होता,' हे उदयनराजेंच स्टेटमेंट त्यांचा पाय आणखी खोलात घेऊन गेले. ज्या पवारांनी 2009 मध्ये उदयराजेंना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं, त्यांना तीनवेळा खासदार केले, त्या पवारांच्या विरोधात उदयनराजेंनी अशाप्रकारे बोलणं जनतेच्या जिव्हारी लागलं.

loading image