ब्रेकिंग ः युटेकच्या ३५ कोटींच्या साखरेचा कोळसा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

आगीने रौद्र रूप धारण केल्याने संगमनेर, प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखाने, देवळाली प्रवरा व राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. संगमनेर व प्रवरानगर व देवळाली प्रवराचे बंब आल्यानंतर पहाटे सव्वापाचच्या सुमारास आग नियंत्रणात आली. 

संगमनेर ः संगमनेर तालुक्याच्या पठार भागात असलेल्या युटेक शुगर या तालुक्यातील एकमेव खासगी साखर कारखान्याच्या स्टोअर हाऊस व गोदामाला आग लागली आहे. या आगीत सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज पहाटे सव्वातीनच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घड़ली.
या बाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील साकूर भागात असलेल्या कौठेमलकापूर येथे पुणे येथील उद्योजक रविंद्र बिरोले यांनी 2012 साली युटेक शुगर या तालुक्यातील पहिल्याच साखर कारखान्याची स्थापना केली.

2017 - 2018 साली चाचणी हंगाम झाल्यानंतर हा कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम आहे. सध्या कारखाना बंद असल्याने कारखान्यावर सुरक्षा रक्षकांशिवाय कोणीही नव्हते. पहाटे कारखान्याच्या स्टोअरच्या दिशेने आग लागलेली पाहताच उपलब्ध साधनांच्या सहाय्याने सुरक्षा रक्षकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ज्वलनशील पदार्थ अधिक असल्याने आग भडकली. या आगीच्या झळा साखर सोठवलेल्या गोदाम क्रमांक 1 पर्यंत पोचल्या.

हेही वाचा - सोन्यावाल्यांना येणार सोन्याचे दिवस

आगीने रौद्र रूप धारण केल्याने संगमनेर, प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखाने, देवळाली प्रवरा व राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. संगमनेर व प्रवरानगर व देवळाली प्रवराचे बंब आल्यानंतर पहाटे सव्वापाचच्या सुमारास आग नियंत्रणात आली. 
या अग्नितांडवात स्टोअसमधील ग्रीस, ऑईल, यंत्रांचे सुटे भाग, प्लॅस्टीक गोण्या, इलेक्ट्रिक केबल, आदी जळून गेले. तर साखर गोदामातील 92 हजार 507 क्विंटल साखरेचे आग व पाण्यामुळे नुकसान झाले. तसेच गोदाम व स्टोअरच्या पत्र्याच्या इमारती आगीमुळे वाकल्या.

ही सर्व साखर महाराष्ट्र सहकारी बँकेकडे मालतारण होती. उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत, घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक अंबादास भुसारे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेत सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कारखान्याचे जनरल मॅनेजर अशोक वाघ यांनी व्यक्त केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Utech burns Rs 35 crore worth of sugar