Vidhan Sabha 2019 : माझ्या बारशाला होते, तेच माझ्या विरोधात; उदयनराजेंचा श्रीनिवास पाटलांना टोला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

माझ्या बारशाला होते, तेच आता निवडणुकीत माझ्या विरोधात उभे आहेत, असा टोला त्यांनी श्रीनिवास पाटलांचा नामोल्लेख टाळून लगावला. भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेत उदयनराजे बोलत होते.

सातारा :  काँग्रेसने निवडणुकीत विविध घोषणा केल्या आणि निवडून आल्यावर लोकांना गाळात घालण्याचे काम केले. मोदींनी मात्र, लोकांना या गाळातून बाहेर काढले. या गाळातून बाहेर आल्यावर लोकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली. आज त्याच गाळातून कमळ उगवले आहे. त्यामुळे सरदार पटेल यांच्याप्रमाणे मोदींना "आयर्न मॅन' हीच संकल्पना लागू पडते, असे मत सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. दरम्यान, माझ्या बारशाला होते, तेच आता निवडणुकीत माझ्या विरोधात उभे आहेत, असा टोला त्यांनी श्रीनिवास पाटलांचा नामोल्लेख टाळून लगावला. भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेत उदयनराजे बोलत होते.

‘त्यांचे नाव आदर्श घोटाळ्यात’
‘माझ्या बारशाला होते, तेच आता निवडणुकीत माझ्या विरोधात उभे आहेत,' असा टोला श्रीनिवास पाटील यांचा नामोल्लेख टाळून करत उदयनराजे म्हणाले, ‘मी त्यांना गेल्या दहा वर्षांत तुम्ही काय केले, असे विचारले तर ते केवळ हसतात. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील, आई विविध पदांवर होते. तुम्ही काम काय केले, असे मी विचारले त्यावर त्यांनी आजपर्यंत जी पदे मिळाली तीच कामे आहेत, असे ते सांगत आहेत. स्वत:ला आदर्श समजणारे त्यांचे नाव आदर्श घोटाळ्यात आहे.’

‘म्हणून मी भाजपमध्ये गेलो’
ते म्हणाले, ‘सध्या माझ्या राजीनाम्याची चर्चा आहे. तीन महिन्यांत राजीनामा देणारा मी पहिला खासदार आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिले, त्यांनी मला सांगितले, की मोदीजींनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांच्यासोबत जा; अन्यथा आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही; पण माझे मनही तेच सांगत होते. त्यामुळे मी भाजपमध्ये गेलो.’

राफेलच्या पुजेवरून राजनाथसिंहांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

‘दगडही निवडून येईल’
ते म्हणाले, ‘मोदींनी एक दगड जरी उभा केला, तरी सर्व जनता मतदान करेल. तुमच्यामुळे एक वेगळा मार्ग दिसला आहे. तो लोकांनी स्वीकारला आहे. मराठा समाज आरक्षणवर बोलले जाते. मात्र, जे स्वतःला मराठा समाजाचे स्ट्रॉंग मॅन म्हणतात त्यांनी काहीही केले नाही. उलट देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्यांना आरक्षण दिले.’

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची आज ईडी चौकशी

‘काँग्रेसने फक्त घोषणा केल्या’
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘आसामनंतर महाबळेश्‍वर हे दुसरे ठिकाण आहे. जिथे बायोडायर्व्हसिटी आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्री झाले. त्यांना कधी वाटले नाही, जिल्ह्यात एखादे विद्यापीठ व्हावे, आयआयटी, आयआयएम व्हावे, मेडिकल कॉलेज व्हावे. कृष्णा खोऱ्याची योजना युती शासनाने राबविली. काँग्रेसने फक्त घोषणा केल्या. जनतेने सत्ता दिली आणि पंधरा वर्षांत भ्रष्टाचार आणि घोटाळा झाला. लोक संकटात पडले, जमिनी गेल्या. त्याकडे दुर्लक्ष केले गेले. मोदींचे मी अभिनंदन करतो, कारण केंद्र व राज्य सरकारने पाच वर्षांच्या काळात बंद पडलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करून त्यांना चालना दिली. मोदींना विनंती करतो, त्यांनी इर्मा योजना लागू करावी.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 bjp leader udayanraje bhosle satara speech shrinivas patil