Vidhan Sabha 2019 : पावसामुळे कोल्हापुरात सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - सध्या राज्यभर वरुणराजा धुवाँधार कोसळत आहे. कोल्हापूर येथे सकाळीच पावसाचे वातावरण जाणवू लागल्याने मतदारराजाने  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळीच गर्दी केली आहे.

कोल्हापूर - सध्या राज्यभर वरुणराजा धुवाँधार कोसळत आहे.  कोल्हापूर येथे सकाळीच ढगाळ वातावरण जाणवू लागल्याने मतदारराजाने  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळीच गर्दी केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांनी सकाळी लवकर मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.  

दरम्यान सोमवारी कोल्हापूर शहरात अनेक भागात खंडीत वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक भागात सकाळी विजेचा लपंडाव सुरू होता. याचा परिणाम मतदान केंद्रावरही जाणवला. अनेक मतदान केंद्रात विज नसल्याने नागरिकांना अंधारात मतदान करावे लागत आहे. मतदान करताना नागरिकांना मोठी अडचण येत होती. ज्येष्ठ नागरिकांना अंधारात काहीच दिसत नसल्याने मतदान करताना गैरसोय झाली. 

दरम्यान, गेले महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थंड झाल्यानंतर आता आज प्रत्यक्षात जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनासह उमेदवारांनीही जोरदार तयारी केली असून त्यांच्याकडून ‘चला मतदानाला...’ असा नारा दिला जात आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे, 

यासाठी या दोन्हीही घटकांकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक १६ उमेदवार हातकणंगले मतदारसंघात असून, या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनाला दोन मतदान यंत्रे जोडावी लागणार आहेत. पहिल्या मतदान यंत्रावर सर्व उमेदवार, तर दुसऱ्या मतदान यंत्रावर ‘नोटा’चा पर्याय असणार आहे. इतर मतदारसंघांत कमीत कमी सहा, तर जास्तीत जास्त १४ उमेदवार रिंगणात आहेत. रिंगणात उमेदवार जास्त असले तरी मतदारसंघनिहाय लढती या दुरंगी, तिरंगी आणि चौरंगीच आहेत. विद्यमान दहाही आमदारांसमोर विरोधकांनी तगडे आव्हान उभे केल्याने शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीतील चुरस पाहायला मिळत आहे. 

एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा गेल्या निवडणुकीत काँग्रेसमुक्त झाला. राष्ट्रवादीने दोन जागा जिंकत कशीबशी लाज राखली, तर शिवसेनेने षटकार ठोकून आपणच जिल्ह्यात एक नंबर पक्ष असल्याचे दाखवून दिले. भाजपनेही दोन जागा जिंकून खाते उघडले. आता काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तर भाजप-शिवसेना युती रिंगणात आहे. युतीच्या विद्यमान आठ आमदारांसमोर आघाडीसह ‘जनसुराज्य’ व अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. काही ठिकाणी भाजपच्या बंडखोरांमुळे युतीच्या जागा धोक्‍यात आल्याचे चित्र आहे. अशा पार्श्‍वभूमीवर होणारी ही निवडणूक अनेकांचे राजकीय भवितव्यही ठरवणार आहे.

दृष्टिक्षेपात निवडणूक
मतदारसंघ ः १०
मतदान कर्मचारी ः १४ हजार
मतदान केंद्रे ः ३३४२
मतदार संख्या ः ३० लाख ९३ हजार ४३
आवश्‍यक वाहने ः १२५९
रिंगणातील उमेदवार ः १०६
महिला उमेदवार - १ (इचलकरंजी)

सध्याचे संख्याबळ
शिवसेना ः ६, भाजप ः २, राष्ट्रवादी ः २, काँग्रेस, जनसुराज्य, वंचित, अपक्ष ः  ०

मतदारसंघनिहाय चुरशीच्या लढती (कंसात त्या मतदारसंघातील एकूण उमेदवार)
करवीर ः चंद्रदीप नरके-शिवसेना विरुद्ध पी. एन. पाटील-काँग्रेस (८)
कोल्हापूर दक्षिण ः अमल महाडिक-भाजप विरुद्ध ऋतुराज पाटील-काँग्रेस (८)
कोल्हापूर उत्तर ः राजेश क्षीरसागर-शिवसेना विरुद्ध चंद्रकांत जाधव-काँग्रेस (८)
कागल ः हसन मुश्रीफ-राष्ट्रवादी विरुद्ध समरजितसिंह घाटगे-भाजप बंडखोर (६)
शाहूवाडी ः सत्यजित पाटील-सरूडकर-शिवसेना विरुद्ध माजी मंत्री विनय कोरे-जनसुराज्य (११)
राधानगरी ः प्रकाश आबिटकर-शिवसेना विरुद्ध के. पी. पाटील-राष्ट्रवादी (१२)
चंदगड ः राजेश पाटील-राष्ट्रवादी विरुद्ध शिवाजी पाटील-भाजप बंडखोर (१४)
इचलकरंजी - सुरेश हाळवणकर-भाजप विरुद्ध प्रकाश आवाडे-अपक्ष (१४)
हातकणंगले ः डॉ. सुजित मिणचेकर-शिवसेना विरुद्ध अशोक माने-जनसुराज्य (१६)
शिरोळ ः उल्हास पाटील-शिवसेना विरुद्ध सावकार मादनाईक-स्वाभिमानी (९)
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Voters come to vote early morning due to rains