विनय कोरेंनी महाआघाडीत येण्यासाठी 'यांच्यामार्फत' सुरु केले प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. कोरे यांच्यासह अपक्ष म्हणून विजयी झालेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला, तर दुसरे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांनी राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवत शिवसेनेला पाठिंबा दिला.

कोल्हापूर - अवघ्या तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला. आता वारे शिवसेनेच्या बाजूने फिरले आहे. फडणवीस तसे आता भाजपला पाठिंबा दिलेले अनेक घटक पक्ष नव्या  महा विकासआघाडीसोबत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात "जनसुराज्य' चे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे हेही भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

हेही वाचा - मंत्रिमंडळात कोल्हापुरातील या आमदारांचा समावेश होण्याची शक्यता

मुश्रीफ यांच्यामार्फत कोरे प्रयत्नशील

दरम्यान, डॉ. कोरे यांनी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यामार्फत त्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. काल (ता. 25) याबाबत दोघांची भेटही झाल्याचे वृत्त आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. कोरे यांच्यासह अपक्ष म्हणून विजयी झालेल्या आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला, तर दुसरे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांनी राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवत शिवसेनेला पाठिंबा दिला. पण राज्यात कोणालाच स्पष्ट बहूमत मिळाले नसल्याने गेले महिनाभर सत्ता स्थापनेचा घोळ सुरू होता. शनिवारी (ता. 23) अचानक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. तत्पुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 

हेही वाचा - कोल्हापुरातील भाजपच्या या सत्ताकेंद्रांना बसणार हादरे 

जिल्हा बंँक, बाजार समितीत मुश्रीफांसोबत

याविरोधात शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने उद्या भाजप सरकारला बहूमत सिध्द करण्याचे आदेश देताना त्यासाठीचे मतदान उघडपणे घ्यावे, असे निर्देश दिले होते. शनिवारी श्री. पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आघाडीचेच सरकार येईल यासाठी फिल्डींग लावली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने याला बळ आले. त्यानंतर पहिल्यांदा श्री. पवार यांनी व नंतर श्री. फडणवीस यांनीही राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाले. भाजपचे सरकार येत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना साथ दिलेल्या घटक पक्षांच्या आमदारांसह अपक्षांची घालमेल सुरू झाली होती. त्यातून डॉ. कोरे हेही भाजपची साथ सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. जिल्हा बॅंक, बाजार समितीत श्री. कोरे हे श्री. मुश्रीफ यांच्यासोबत आहेत, त्यातूनच त्यांनी आघाडीसोबत जाण्यासाठी श्री. मुश्रीफ यांच्यामार्फत मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinay Kore Attempt To Enter Maha Vikas Aghadi