चला ! पंचगंगा घाट अनुभवूया; जाणून घेऊया दडलेला इतिहास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

चला ! पंचगंगा घाट अनुभवूया

‘सकाळ’ माध्यम समूहाच्या पुढाकाराने हेरिटेज वीकच्या निमित्ताने हा उपक्रम होणार आहे. मूर्ती व मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर सर्वांशी संवाद साधणार असून, सकाळी सात वाजता हा उपक्रम होईल. या उपक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.

कोल्हापूर :  येथील पंचगंगा घाटाला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इतिहास आहे आणि आता तर हा घाट परिसर शूटिंगसाठीचे एक परफेक्‍ट डेस्टिनेशन म्हणूनही ओळखला जात आहे. एकूणच हा घाट असो किंवा घाटावरील विविध मंदिरांची स्थापना आणि तेथील प्रत्येक गोष्टीमागे दडलेल्या इतिहासाची माहिती शनिवारी (ता.२३) उलगडणार आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या पुढाकाराने हेरिटेज वीकच्या निमित्ताने हा उपक्रम होणार आहे. मूर्ती व मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर सर्वांशी संवाद साधणार असून, सकाळी सात वाजता हा उपक्रम होईल. या उपक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.

‘सकाळ’च्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी ‘चला, मातीचा वारसा जपू या’ ही मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील बावीसहून अधिक वारसास्थळांची यानिमित्ताने कोल्हापूरकरांनी स्वच्छता केली. त्यानंतर त्या त्या परिसरातील सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी तेथील वारसास्थळांच्या जतन व संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. हेरिटेज वीकच्या निमित्ताने एकूणच शहरातील वारसास्थळांच्या जतन व संवर्धनाबाबत ऊहापोह मांडण्याचेही हा उपक्रम निमित्त ठरणार आहे. 

नदीपात्रात अनेक लहान-मोठी मंदिरे

शहराच्या वायव्येस पंचगंगा नदीकाठी बांधलेला हा विस्तीर्ण घाट असून, घाटाच्या सभोवताली व प्रत्यक्ष नदीपात्रात अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत.  याच परिसरात राजघराण्यातील व्यक्तींची स्मृती मंदिरेही येथे आहेत. त्यापैकी सर्वात मोठे व सुंदर देवालय श्री छत्रपती तिसरे शिवाजी यांचे आहे. हे देवालय १८८५ रोजी बांधले आहे.

घाटाचे संपूर्ण बांधकाम दगडात

पंचगंगा घाटाचे संपूर्ण बांधकाम दगडात केलेले आहे, घाटाचा परिसर निसर्गरम्य आहे. त्याच्या उत्तरेस मोठ्या कमानी असलेला शिवाजी पूल आहे. येथून जवळच ब्रह्मपुरी टेकडी म्हणजे कोल्हापूर शहराच्या अतिप्राचीन पहिल्या वसाहतीचा भाग आहे. शहरातील वारसा स्थळांच्या यादीत या परिसराचा समावेश असून, या उपक्रमाच्या निमित्ताने त्याची इत्थंभूत माहिती जाणून घेता येणार आहे. शहरातील कैक जणांना अजूनही येथील मंदिरांची माहिती नाही, तसेच नव्या पिढीला माहिती असण्याची शक्‍यताही नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम होणार आहे. 

दडलेला इतिहास...
सकाळी सातपर्यंत सर्वांनी पंचगंगा घाटावरील पाराजवळ जमायचे असून, त्यानंतर घाटावरील मंदिरांच्या पाहणीला प्रारंभ होईल. ज्येष्ठ नागरिक, अभ्यासक, विविध प्रकारचे संशोधन करणारे विद्यार्थी असोत किंवा अगदी शाळकरी मुलेही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. चला तर मग दीपोत्सवाच्या निमित्ताने आपण पंचगंगा घाटाचा विलोभनीय आविष्कार अनुभवला. आता या उपक्रमाच्या निमित्ताने तेथे दडलेला इतिहासही जाणून घेऊया...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Visit Sakal Event To Know Panchganga Ghat History