esakal | प्रतीक्षा : रंगमंचावरील अंधार दूर होण्याची
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतीक्षा : रंगमंचावरील अंधार दूर होण्याची

प्रतीक्षा : रंगमंचावरील अंधार दूर होण्याची

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सांगली : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान अवघे चार महिनेच नाट्यगृहाचा पडदा उघडला गेला. रंगमंच सध्या अंधारातच आहे. त्यामुळे निर्माते, कलाकारांसह ‘बॅकस्टेज’ कलाकार, नाट्य व्यावसायिक अशा सर्वच घटकांना मोठा फटका बसला. एकीकडे राजकीय कार्यक्रम, आंदोलने मोठ्या संख्येने राजरोस होत असताना नाटकांवरच बंदी का? असा सवाल संबंधित सर्व घटक विचारत आहेत. मायबाप सरकारने रंगमंचावरील अंधार दूर करावा, अशी मागणी होत आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यावर ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आला. कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना दिवाळीदरम्यान निर्बंध शिथिल करण्यात आले. नाट्यगृहांचा पडदा उघडण्यास सर्वांत उशिराने परवानगी दिली गेली. तसेच, नाटकांचे प्रयोग सादर करण्यासाठी ५० टक्केच प्रेक्षक क्षमतेची अट घालण्यात आली. तोट्यात प्रयोग सादर करणे अशक्य असल्याने नाटकांचे प्रयोग करण्यात अडथळे आले. कलाकार आणि इतर मंडळींनी नाट्यचळवळ सुरू राहण्यासाठी मानधनात कपात केली. नाटक सुरू राहण्यासाठी संबंधित घटकांनी पावले उचलली.

हेही वाचा: सांगलीत निकाल जाणून घेण्यासाठी पालकांची 'सत्वपरीक्षा'

गेल्या वर्षीची पहिली लाट ते आताची दुसरी लाट या कालावधीत अवघे चार महिनेच नाट्यगृह सुरू राहिले. परंतु, दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा नाट्यगृहांचा पडदा खाली करण्याचे आदेश झाले. त्यामुळे रंगमंचावर पुन्हा एकदा अंधारच पसरला आहे. त्यामुळे निर्माते, कलाकार, बॅकस्टेज कलाकार, नाट्य व्यावसायिक, नाट्यगृहातील कर्मचारी आदींच्या जीवनातही सध्या अंधारच आहे. नाट्यगृहे सुरू करावीत, अशी मागणी कलाकार व इतर मंडळी करीत आहेत. परंतु, मायबाप शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे राजकीय मंडळींचे कार्यक्रम होतात, त्यांच्या दौऱ्यात मोठी गर्दी होत आहे, जवळपास सर्वच राजकीय पक्षांची आंदोलने होतात, त्यांना परवानगी मिळते, परंतु नाट्यगृहात सर्व नियमांचे पालन करून नाटक व इतर कार्यक्रम सादर करण्यात परवानगी दिली जात नाही. त्यामुळे संतापाची भावना व्यक्त होत आहे.

"कोरोनाच्या संकटामुळे नाट्यक्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे. नाट्यसृष्टीसाठी हा अतिशय भयंकर असा काळ म्हणावा लागेल. नाट्यक्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षी नाट्यगृह सुरू करण्यात सर्वांत उशिराने परवानगी दिली. नाट्यचळवळ पुढे नेण्यासाठी शासनाने मदत करण्याची गरज आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाल्यावर नाट्यगृहे त्वरित सुरू करावीत."

- मारुती गायकवाड, नाट्य व्यावसायिक

हेही वाचा: CET Exam ची अनिश्चितता; 11 वी प्रवेशाचे भिजत घोंगडे कायम

दीड वर्षात आठ प्रयोग

नाटकांना परवानगी मिळाल्यावर सांगलीत केवळ सात ते आठ नाटकांचे प्रयोग निम्म्या प्रेक्षक क्षमतेने सादर करण्यात आले; तर लावणीचे पाच ते सहा कार्यक्रम झाले.

loading image