मी चिंता करण्याचे कारण नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग लि. या साखर कारखान्याच्या पोती पूजन व शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. त्यावेळी पवार यांनी पाण्याचा प्रश्‍न 100 वर्षांपासून आहे. तो संपविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सूचित केले.

 

मायणी (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यात 100 वर्षे पाण्याचा प्रश्न कायम आहे. तो संपविण्यासाठी काही करायला हवे. येत्या आठ- दहा दिवसांमध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन सगळे जण एकत्र बसून पाणीप्रश्‍नाचा निकाल लावू, असे आश्‍वासन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिले. पाणीप्रश्‍नासंबंधी रामराजेंचा उत्तम अभ्यास आहे. ते मार्ग काढतील आणि मार्ग काढल्यानंतर जे घडत नाही ते घडवायचं काम मी करेन, असेही त्यांनी नमूद केले.
 
पडळ (ता. खटाव) येथील खटाव- माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग लि. या साखर कारखान्याच्या पोती पूजन व शेतकरी मेळाव्यात श्री. पवार बोलत होते. त्या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, डॉ. तानाजीराव चोरगे, डॉ. सुभाष एरम, सतीश सावंत, सत्यजितसिंह पाटणकर, सुरेंद्र गुदगे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, बाळासाहेब सोळसकर, खटावच्या सभापती रेखा घाडगे, बाजार समितीचे सभापती विजय काळे, कल्पना खाडे, प्रा. कविता म्हेत्रे उपस्थित होते.

जरुर वाचा - एसटीला अभिमान तुमच्‍या प्रामाणिकतेचा
 
दुष्काळी खटाव तालुक्‍यात तिसरा साखर कारखाना काढण्याचं धाडस प्रभाकर घार्गे व सहकाऱ्यांनी केल्याचे कौतुक करून ते म्हणाले, ""दुष्काळी भागात टेंभू, उरमोडी, तारळी अशा विविध योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढणार आहे. क्षमतेपेक्षा अधिक गाळप केल्याशिवाय हा धंदा परवडत नाही. त्यामुळे आणखी क्षेत्र वाढण्याची गरज आहे.'' 
केंद्र सरकारने कालच बैठक घेतली. त्यानुसार जगात मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखरेला चांगले दिवस आहेत. साखर कारखाना, वीज इथेनॉल यावर संशोधन करणाऱ्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. लवकरच मांजरी येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन त्यावर सर्व तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

नक्की वाचा - Video : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही अनसंग
 
रामराजे म्हणाले, ""सिंचन योजनांच्या पाण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे ठिबक सिंचन केले, तरच पाणी पुरणार आहे. पाणी जपून वापरा. जमिनीचा पोत राखा. अतिपाण्याने फलटण, बारामती भागात ऊस लावायचा की मीठागरे करायची हे ठरवायची वेळ आली आहे.'' प्रभाकर घार्गे म्हणाले, ""संकटावर मात करण्याची ऊर्जा शरद पवारांमुळे मिळते. गेल्या चार-पाच वर्षांत तालुक्‍याचे राजकीय, सामाजिक पतन झाले आहे. ते दुरुस्त करायला हवे.'' प्रदीप विधातेंनी मनोगत व्यक्त केले. संचालक नंदकुमार मोरे यांनी स्वागत केले. सहअध्यक्ष मनोज घोरपडे यांनी प्रास्ताविकात कारखान्यातील तंत्रज्ञान व उत्पादनाबाबत माहिती दिली.

हेही वाचा - गाढवांचा बंदाेबस्त करा ; राऊत, आव्हांडावर सातारकरांचा हल्लाबाेल 

फायदा करून घ्या... 

इथला पाण्याचा प्रश्‍न 100 वर्षांपासून आहे. तो संपविण्यासाठी काही करायला हवे. या कारखान्यामुळे फलटणच्या कारखान्याला धक्का बसणार नाही. त्यामुळे रामराजे तुम्ही किंवा मी चिंता करण्याचे कारण नाही. दिवस बदललेत. बदलत्या दिवसांचा फायदा करून घ्यायला पाहिजे, असा सल्ला श्री. पवार यांनी उपस्थितांना दिला.

जरुर वाचा -  जाणता राजा ही शिवछत्रपतींची उपाधी नव्हेच : शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Scarcity Problem Of Khatav Taluka Should be Solved Says Sharad Pawar