छानच की...सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रथमच नवे पदवी प्रमाणपत्र

तात्या लांडगे
शनिवार, 14 डिसेंबर 2019

- शैक्षणिक साहित्याची विद्यापीठाने काढली एक कोटींची निवीदा
- नामविस्तारानंतर प्रथमच मिळणार विद्यार्थ्यांना नवे साहित्य
- अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निविदेकडे सिनेट सदस्यांचे बारिक लक्ष
- केंद्रीय खरेदी समितीच्या मार्फत निश्‍चित केली जाणार निवीदा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केंद्रीय खरेदी समितीला डावलून स्वत:च्या अधिकारात एक उपसमिती स्थापन केली होती. मात्र, व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्यांनी विरोध केल्यानंतर आता ती बरखास्त केल्याने केंद्रीय खरेदी समितीच्या माध्यमातून एक कोटींची निवीदा अंतिम केली जाणार आहे. दरम्यान, विद्यापीठ नामविस्तारानंतर विद्यार्थ्यांना प्रथमच अहिल्यादेवी यांचा फोटो आणि त्यांचे नाव असलेले पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे.

हेही वाचाच...पोलिस निरीक्षक अडकले चौकशीच्या जाळ्यात

सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर विद्यापीठाकडे तब्बल तीन लाख उत्तरपत्रिका शिल्लक होत्या. पदवी प्रमाणपत्रासंह अन्य शैक्षणिक साहित्यही सोलापूर विद्यापीठाच्या नावे उपलब्ध होते. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी सुमारे एक कोटी रुपयांच्या किंमतीचे साहित्य रद्दी टाकून नव्या शैक्षणिक साहित्याची मागणीही केली होती. मात्र, एक कोटी रुपयांची रक्‍कम मोठी असल्याने त्याबाबत लेखी पत्रव्यवहार झाला नाही. आता उपलब्ध साहित्य संपल्याने विद्यापीठाने तत्काळ नवी निवीदा काढली आहे. मात्र, विद्यापीठात निवीदा घेण्यात लॉबिंग होत असल्याची चर्चा असल्याने व्यवस्थापन परिषदेसह काही सिनेट सदस्य व संघटनांनी एक कोटींच्या निविदेवर लक्ष केंद्रीत केले आहे. तत्पूर्वी, कुलगुरुंनी निवीदा अंतिम करण्यासाठी स्वत:च्या अधिकारात स्थापन केलेली उपसमिती बरखास्त केल्याने आता ही प्रक्रिया केंद्रीय खरेदी समितीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे.

हेही वाचाच...कर्जवाटपात बॅंकांनी हात आखडला

ठळक बाबी...
- एक कोटींच्या शैक्षणिक साहित्यासाठी विद्यापीठाने मागविली निवीदा
- ई-टेंडरिंगद्वारे अंतिम होणाऱ्या निवीदेवर व्यवस्थापन परिषदेचे लक्ष
- केंद्रीय खरेदी असतानाही कुलगुरुंनी स्थापन केलेली उपसमिती बरखास्त
- विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार नवे पदवी प्रमाणपत्र
- विद्यापीठाच्या यापुढील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार नवी उत्तरपत्रिका अन्‌ गुणपत्रिका

हेही वाचाच...'हा' भाजप नेता दाखल करणार अब्रुनुकसानीचा दावा

पूर्वीचे शैक्षणिक साहित्य संपले
विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर विद्यापीठाकडे पूर्वीचे शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणावर शिल्लक होते. त्यावर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा शिक्‍का मारुन पूवीचे शैक्षणिक साहित्य वापरात आणले. आता उत्तरपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिकांसह अन्य साहित्य संपल्याने नव्याने एक कोटींची निवीदा काढण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नवे पदवी प्रमाणपत्र मिळेल.
- डॉ. व्ही. बी. घुटे, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Well...students will get a new degree certificate for the first time