परदेशी पक्षांच्या स्थलांतरावर कशाचा परिणाम ? (व्हिडिओ)

अर्चना बनगे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्षांच्या संवर्धनाबाबत पक्षी मित्र, पर्यावरणप्रेमींकडून आता मोठ्या प्रमाणात जागरूकता सुरू झाली आहे. जगामध्ये १० हजार ४५१ प्रजाती, भारतात १३०१ प्रजाती, महाराष्ट्रात ६११ विविध प्रजाती तर कोल्हापूर जिल्ह्यात विभागवार एकूण  २८० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. 

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये तब्बल २८० पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये 40 हून अधिक प्रकारचे पक्षी स्थलांतरित होऊन येत असतात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थलांतर होऊन येणाऱ्या पक्ष्यांच्या आगमनावर परिणाम झाला आहे.

पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्षांच्या संवर्धनाबाबत पक्षी मित्र, पर्यावरणप्रेमींकडून आता मोठ्या प्रमाणात जागरूकता सुरू झाली आहे. जगामध्ये १० हजार ४५१ प्रजाती, भारतात १३०१ प्रजाती, महाराष्ट्रात ६११ विविध प्रजाती तर कोल्हापूर जिल्ह्यात विभागवार एकूण  २८० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. 

हे परदेशी पाहूणे येतात

थंडीच्या दिवसात म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अनेक पक्षी स्थलांतर करत असतात. यामध्ये स्थानिक आणि परदेशी स्थलांतर असे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. स्थानिक स्थलांतरामध्ये चित्रबलाक, उघडया चोचीचा बलाक चमचा पक्षी, छोटा मराल,पाणकोंबड्या,(पांढऱ्या छातीची, जांभळी, काळी, वारकरी) पाणकोंबड्या, शेकाट्या, कंठेरी चिलखा, तुतवार, पांढरा धोबी, मोठा धोबी, करडा धोबी या प्रजाती दिसून येतात. याशिवाय खास थंडीमध्ये निलपंख, कोतवाल, सुगरण, कापसी घार, तिर चिमणी, गोरली हे पक्षी पाणथळ जागेतल्या गवताळ प्रदेशात शेतवाडीजवळ दिसून येतात. राखी बगळा, करडी बगळा, हळदी कुंकू, चिमणी ,कावळा,  भांगपडी मैना,  खंड्या, वेडा राघू, लहान बगळा, खाटीक ,राखी वटवट्या, कवड्या, भारद्वाज, चष्मेवाला , कवड्या ,सुतार पक्षी,  मोर हे वर्षभर दिसणारे पक्षी आहेत. 

महापूरामुळे झाला परिणाम

हरित प्रलवके, पाण्यात बुडालेल्या वनस्पती, पाण्यातून डोकावणाऱ्या वनस्पती, जलसाठ्याच्या किनाऱ्यावरच्या वनस्पती, गवताळ वनस्पती यावर हे पक्षी जगत असतात. पण कोल्हापूर, सांगली याठिकाणी जो महापूर आला त्याचा परिणाम याच्यावर झाला. 30 ते 35 टक्के अधिक पाऊस झाल्यामुळे पाणथळ्याच्या ठिकाणी जास्त दिवस पाणीसाठा राहिला. पाण्याचा पीएचही बदलला. पाण्याची आम्लता वाढली. परिणामी पाण्यात असलेले शंख, शिंपले, झिंगे, मासे ,कीटक याची उपलब्धता कमी पडली. वादळामुळे घरटी नष्ट झाली. प्रजोत्पादनाला खीळ बसली परिणामी पक्ष्यांच्या संख्यामध्ये घट निर्माण झाली आहे.  त्यातच परतीचा पाऊस लांबला, चक्री वादळ, पर्यावरणातील बदल यामुळे यावर्षी परदेशी पक्षी पाहुणे येण्यास विलंब झाला आहे. 

पक्ष्यांचे नैसर्गिकरित्या संवर्धनकरण्यासाठी बाह्य प्रदूषण रोखले पाहिजे, पाणवठे जपले पाहिजेत, गावगाड्यातून निसर्ग मित्र होणे अपेक्षित आहे, शिवाय झाडे लावत असताना काटेसावर,वड, पिंपळ, उंबर, पंगारा,सिंगापूर चेरी, बर्ड चेरी अशा फळांची आणि फुलांची  झाडे लावणे गरजेचे आहे. यासाठी आता एक पाऊल प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे.

हे परदेशी पक्षी येतात...
दलदल ससाणा, छोटी पनशिटी, मालगुजा, ठिपक्यांच्या तुतवार, थापड्य, हे परदेशी पक्षी स्वीझरलँड,ऑस्ट्रेलिया,लडाख, तिबेट, आशिया खंडातून भारतात येतात. तर भारतात मध्य,पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप येथून अनेक पक्षी येत असतात. चिमण शेंद्रया (कॉमन पोचार्ड) हा पक्षी उत्तर युरोप ,पूर्व सौदेरिया येथून ४ ते ५ वर्षातून एकदा येतो.
 

पाणथळ जागांचे संवर्धन गरजेचे

नैसर्गिक आणि अनैसर्गिक पाणथळ जागांचे संवर्धन हे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व जागतिक तापमान वाढ, वातावरण बदल या संकटापासून दूर राहण्यासाठी त्याचे संरक्षित संवर्धन करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.
- सुहास वायंगणकर, वन्यजीव अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which Effects On Migration of Birds