
रायबाग (बेळगाव) : संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावरील कुडची हे तितकेच शांत व सुजान नागरिकांचे शहर. सर्वधर्मसमभाव या मंत्रामुळे त्याचा जिल्ह्यात वेगळाच लौकिक. पण कोरोनारुपी विळखा जबरदस्त घाव घालत या शहराच्या प्रतिमेचाच घात करत आहे. मात्र नियतीने साधलेल्या आभाळाएवढ्या संकटावर मात करत पूर्वापार जपलेल्या 'पॉझिटिव्ह एनर्जी'च्या जोरावर हे शहर लवकरच 'यू-टर्न' घेणार आहे.
रायबाग तालुका हा विविध कारणांनी प्रसिद्ध आहे. कुडची शहराने त्यात नेहमीच भर घातली आहे. त्यामुळेच शहराला विधानसभा मतदार संघाचे केंद्रस्थान देखील प्राप्त झाले आहे. नगर परिषदेचे ठिकाण असलेल्या शहराची लोकसंख्या ५० हजार एवढी आहे. मुस्लिम बांधवांची संख्या जास्त असली तरी हिंदू बांधवांकडून तक्रारीची कुरकुर एकदाही कानी पडलेली नाही.
हिंदू-मुस्लिम ऐक्य व सर्वधर्मसमभाव ही या शहराची जमेची बाजू आहे. कृष्णाकाठावर असल्याने येथील लोक संपत्तीसह मनाने अधिकाधिक समृद्ध होत गेले आहेत. मात्र गेल्या पंधरा दिवसातच शहराला कोरोनारुपी महाराक्षसाची दृष्ट लागली. या अदृश्य राक्षसाने बघता बघता दहा जणांना आपल्या कवेत घेतले. त्यानंतर कुडचीकडे पाहण्याचा राज्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. या निर्मळ शहराचे 'कोरोनागस्त' असे नामकरण झाले.
नागरिकांना सावरण्यासाठी शासन विविध खात्यांच्या माध्यमातून येथे ठाण मांडून आहे. पण इतर लोकांच्या मनात शहराविषयी बनलेली प्रतिमा पुसणार कशी? हा प्रश्न आहे. मात्र काळ हा त्यावरील उत्तम उपाय आहे. भूतकाळात शहराने जिल्ह्याला व पर्यायाने राज्याला खूप काही दिले आहे. त्या जोरावर भविष्यकाळात देखील कुडची राखेतून उठून नवीन उभारी आणि भरारी घेणार आहे. त्यासाठी खचलेल्या नागरिकांना सर्वांनी सकारात्मक विचारातून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे.
भावंडरुपी कुडचीला हवीय कृष्णाकाठाकडून नवसंजीवनी
कृष्णाकाठ हा सर्वच बाबतीत समृद्ध आहे. आपल्याच भागातील भावंडरुपी कुडचीला नवसंजीवनी देण्यासाठी काठावरील प्रत्येक गाव आणि नागरिकाने पुढे येऊन आपापल्या परीने मानसिक बळ देण्याची गरज आहे. त्यात कृष्णाकाठ कधीच मागे पडणार नाही, असा विश्वास कृष्णामाईचे पाणी प्यालेल्या प्रत्येकाकडून व्यक्त होत आहे.
'कुडची शहराने २००५ व २०१९ सालचा महापूर पचवीला आहे. पण कोरोनाचे संकट जड जात आहे. मात्र येथील प्रत्येक माणूस मनाने खंबीर आहे. प्रशासन, पोलिस, आरोग्य व विविध खात्यांचे मदतकार्य अविस्मरणीय ठरत आहे. त्यामुळे जास्त काळ कोरानाचे वावटळ येथे घोंघाऊच शकणार नाही.'
-सादीक सजन,नगरसेवक, कुडची
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.