या तालुक्‍यात आहे फक्त महिलाराज 

चेतन लक्केबैलकर 
Saturday, 15 February 2020

खानापूर तालुक्‍यात सध्या महिलाराज अवतरले आहे. आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय कार्यालयांचे प्रमुखपद महिला भूषवीत आहेत.

खानापूर  (बेळगाव) : महिला आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी नेहमीच होत असते. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. मात्र, खानापूर तालुक्‍यात सध्या महिलाराज अवतरले आहे. आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय कार्यालयांचे प्रमुखपद महिला भूषवीत आहेत. 
घर सांभाळण्यात स्त्रियांचा वाटा मोठा असला तरी सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग नगण्यच असतो. मात्र, खानापूर तालुका याला अपवाद ठरला आहे. आमदार डॉ. अंजली निंबाळकर विधानसभेत तालुक्‍याचा आवाज बुलंद करीत असताना प्रशासनावरही महिला अधिकारी वचक ठेवून आहेत. तहसील, हेस्कॉम, महिला व बालकल्याण, न्यायव्यवस्था आदींचे प्रमुखपद महिला सांभाळत आहेत. गुन्हेगारांना धडकी भरविणारी व जंगलात निर्धास्तपणे फिरुन वनसंपदेचे संवर्धन करणारीही महिला आहे. 

हे पण वाचा - मॉन्सून लांबला तरी चिंता करण्याची गरज नाही

राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून महिलांना प्रतिनिधीत्व देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जात नाही. महिला कर्तृत्व दाखविण्यास पुढे येत असल्या तरी त्यांना फारसा वाव दिला जात नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेस व भाजपात महिलांना नगण्यच स्थान आहे. म. ए. समितीकडूनही केवळ निवडणुकीतील आरक्षणामुळेच महिलांना स्थान दिले जाते. भाजपच्या सगळ्या घटकांसाठी संघटना आहेत. पण, महिला मोर्चा अस्तित्वात नाही. तरीसुद्धा आज तालुक्‍यावर महिलाराज प्रस्थापित झाले आहे. या महिलांनी आपल्या कामांचा ठसा उमटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ग्रामीण महिलांसाठी त्यांचे कार्य दिलासादायक ठरत आहे. त्याबद्दल तालुक्‍यातून त्यांचे कौतुकही होत आहे. 

हे पण वाचा - Valentine Day Special : एकतर्फी प्रेमात पडलेल्याला  व्हॅलेंटाईन डे पडला महागात..

महत्त्वाच्या पदावरील काही महिला 
डॉ. अंजली निंबाळकर : आमदार, के. विद्या : जेएमएफसी न्यायाधीश, रेश्‍मा तालीकोटी : तहसीलदार, नंदा कोडचवाडकर : तालुका पंचायत अध्यक्षा, श्वेता मजगावी : तालुका पंचायत उपाध्यक्षा, कल्पना तिरवीर : सहाय्यक कार्यकारी अभियंता हेस्कॉम, परवीन शेख : संचालिका महिला व बाल कल्याण खाते, सुमा नाईक : पोलीस उपनिरीक्षक, कविता इरनट्टी : वनक्षेत्रपाल कणकुंबी 

तालुक्‍याची सूत्रे महिलांच्या हाती असणे ही आनंदाची बाब आहे. महिला घर-संसार समर्थपणे सांभाळू शकतात. तालुक्‍याचा कारभारही हाताळू शकतात. महिलांच्या सहभागामुळे विकासाला खिळ बसते हे विधान आम्ही खोटे ठरवले आहे. आता सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. 
- डॉ. अंजली निंबाळकर, आमदार 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women power in khanapur taluk belgaum district