
भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी समजताच कुस्तीप्रेमींना मोठा धक्का बसला.
सांगली : भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी समजताच कुस्तीप्रेमींना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावरून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला. हिंदकेसरी खंचनाळे सांगली जिल्ह्यात कुस्ती मैदानासाठी पूर्वी यायचे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया....
सुवर्णक्षणाचे आम्ही साक्षीदार
एनआयएस प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचमधून मी स्वत:, तसेच ऑलिपिंकवीर खाशाबा दळवी आणि बापूसाहेब राडे आदी हिंदकेसरी किताबाची कुस्ती बघण्यासाठी 1959 मध्ये पंजाबला गेलो होतो. इराणचे प्रशिक्षक आमिर हामिदी यांनी आम्हाला नेले होते. पहिला किताब कोण पटकावणार अशी उत्सुकता तेव्हा होती. महाराष्ट्राच्या मातीतील श्रीपती खंचनाळे यांनी तो किताब पटकावल्यानंतर आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झाला. या सुवर्णक्षणाचे आम्ही साक्षीदार बनलो. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच खूप दु:ख झाले. महान मल्ल हरपला असे म्हणावे लागेल.
- पै. राम नलवडे (वय 96, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त)
महाराष्ट्राचा पहाडी मल्ल हरपला
1959 मध्ये महाराष्ट्राला देशातील पहिले हिंदकेसरीपद मिळवून देऊन पै. खंचनाळे यानी महाराष्ट्राची शान वाढविली. त्यांनी कारकिर्दीत दिल्ली, पंजाबबरोबर पाकिस्तानातील मल्लांबरोबर कुस्त्या करून नाव संपूर्ण देशात केले. ते मनमिळावू स्वभावाचे व लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना आदराने वागवायचे. त्यांच्या दु:खद निधनाने राज्याच्या कुस्ती क्षेत्रामध्ये दु:खाची छाया पसरली आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा पहाडी मल्ल हरपला असे म्हणावे लागेल.
- पै. नामदेवराव मोहिते, (कार्याध्यक्ष, राज्य कुस्तीगीर परिषद)
मार्गदर्शक, संघटक गेला
हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे म्हणजे कुस्ती क्षेत्रातील एक महान मल्ल म्हणावे लागेल. 1959 मध्ये हिंदकेसरी किताबासाठी त्यांनी बंतासिंगबरोबर लढत दिली. पहिल्या दिवशी कुस्ती बरोबरीत सुटली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या कुस्तीत त्यांनी बंतासिंगला पराभूत करून किताब पटकावला. कोणाचीही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे विचार मांडणारे स्पष्टोक्ते होते. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रातील अनुभवी भीष्माचार्य, मार्गदर्शक, संघटक गेल्याचे दु:ख तमाम कुस्तीगिरांना झाले आहे.
- उत्तमराव पाटील, (आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक)
कुस्ती क्षेत्राची मोठी हानी
भारताचे पहिले हिंदकेसरी असलेल्या श्रीपती खंचनाळे यांची अनेक ठिकाणी मैदानात भेट व्हायची. तेव्हा आटपाडीसारख्या दुष्काळी भागातील मल्लांची माहिती घेऊन कौतुक करायचे. गरीब मल्लांना ते नेहमी मदत करायचे. मल्लांच्या पाठीशी उभे राहणारे ते खऱ्या अर्थाने मार्गदर्शक होते. धाडसी मल्ल म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होती. महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशभर त्यांनी केले होते. त्यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
- पै. नामदेवराव बडरे, (शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त)
निधनाने कुस्ती क्षेत्रामध्ये मोठी पोकळी
हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचा आदर्श घेऊनच आम्ही कुस्तीचे धडे गिरवले. कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी खंचनाळे आदींना आदर्श मानायचो. प्रत्येक महिन्याला जाऊन त्यांची भेट घेत होतो. ते देखील वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करायचे. आज त्यांच्या निधनाने मोठी पोकळी कुस्ती क्षेत्रामध्ये निर्माण झाली आहे.
- पै. चंद्रहार पाटील, (डबल महाराष्ट्र केसरी)
संपादन : युवराज यादव