esakal | सिंगणापूरमधील तीन देवांना जमीन दान दिल्याचा सापडला पुरावा; काटकर, कुमठेकरांचे संशोधन

बोलून बातमी शोधा

Yadav inscriptions found at Kudnur historical marathi news}

शिलालेखाचे दोन भाग झाले होते. शिलालेखावर वरच्या बाजूला गाय, सुर्य-चंद्र व शस्त्र अशी चित्रे कोरली आहेत.

paschim-maharashtra
सिंगणापूरमधील तीन देवांना जमीन दान दिल्याचा सापडला पुरावा; काटकर, कुमठेकरांचे संशोधन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : कुडनूर (ता. जत) येथे यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर यांना मिळाला. सिंगणापुरातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पाच वर्षांपासून या दोघांचे संशोधन सुरू आहे. हा शिलालेख मारुती मंदिराशेजारील रस्त्यावर भंगलेल्या अवस्थेत होता. तालुक्‍यात चालुक्‍य आणि यादवकालीन काही शिलालेख मिळाले आहेत. जत तालुक्‍याच्या किमान एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडतो. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गेली काही वर्षे जत तालुक्‍यातील याच शिलालेखांवर अभ्यास करीत आहेत. यात त्यांना जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांच्या सीमेवर असलेल्या कुडनूरला मारुती मंदिराच्या पश्‍चिम बाजूस असलेल्या रस्त्यालगत भंगलेल्या अवस्थेतील शिलालेख आढळला. 

कुडनूर येथील बाळासाहेब मासाळ, संतोष पांढरे, सतिश पांढरे, नायकू सुतार, सुभाष पांढरे यांनी  शिलालेख गावात असल्याची माहिती प्रा. काटकर, कुमठेकर यांना पाच वर्षांपूर्वी दिली होती.
शिलालेखाचे दोन भाग झाले होते. शिलालेखावर वरच्या बाजूला गाय, सुर्य-चंद्र व शस्त्र अशी चित्रे कोरली आहेत. इतिहास अभ्यासक प्रा. काटकर, कुमठेकर यांनी सदर लेख उतरुन घेऊन तज्ज्ञांकडून वाचन करून घेतले. यात नऊ ओळी आहेत. वरील बाजूस चार अस्पष्ट अक्षरे आहेत. सदर लेखात सिंगणापूर येथील श्री सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंघणेश्वर या तीन देवांना बागायत जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. 

हेही वाचा- Corona Side Effects : मुलगा-सुनेकडून आमचा छळ होतोय तर आमचं जगणं मुश्‍किल झाल्याचं मुलांचे मत

कुडनूरला सापडला यादवकालीन शिलालेख

सध्याच्या कुडनूरजवळच सिंगणापूरचे गांव आहे. या गावात असलेल्या महादेवांच्या तीन स्थानांचा उल्लेख या लेखात आहे. मात्र, सध्या अशा नावांची कोणतीही मंदिरे या दोन्ही गावात नाहीत. अक्षरांच्या वळणावरुन आणि लिपीवरुन हा लेख उत्तर यादव काळातील असावा असाही अंदाज आहे. या लेखात सिंघणेश्वर असा उल्लेख केला आहे. कदाचित तो यादवराजा सिंघण याच्या नावावरुन स्थापन केलेल्या मंदिराचा असावा. जत तालुक्‍यात सिंघणहळ्ळी आणि सिंगणापूर अशी गावांची नांवे आढळतात. तीही यादवराजा सिंघण याच्या नावावरुनच असावीत.


ओढ्यांच्या संगमावर कुडनूर हे गाव दोन ओढ्यांच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ते तेथून थोड्या अंतरावर होते. त्याला पांढरीचे रान म्हणतात. याच गावाजवळ सिंगणापूरलगत संबंधित तीन मंदिरांना जमीन दिली असल्याने सदरचा शिलालेख कुडनूर गावाच्या हद्दीत आला असावा, असेही संशोधक कुमठेकर यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे